आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत गुंगीचे आैषध देऊन लुटले; दाेघे भामटे अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - अलाहाबाद पॅसेंजरमध्ये अनोळखींनी बळजबरीने चहा पिण्यासाठी देऊन गुंगी आलेल्या प्रवाशाच्या खिशातील हजार रुपयांची रोकड लांबवणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन भामट्यांना आरपीएफ जवानांनी ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता भुसावळ स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर घडली.
भुसावळ स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर अलाहाबाद पॅसेंजर लागली होती. त्यात बालकेश बनवारी पासवान (रा. मुदोल, कनार्टक) हा बसल्यावर तेथे दोन जण आले. कोठे जात आहे, कुठून आलास? अशी विचारपूस झाल्यावर या दोघांपैकी एकाने दोन चहा आणून बालकेशला पिण्यासाठी दिला. चहा थाेडा पिताच कडू लागल्याने त्याने फेकून दिला. मात्र, काही मिनिटांतच त्याला गुंगी आली. अर्धवट गुंगीत असलेल्या बालकेशच्या खिशातील चार हजार रुपये भामट्यांनी काढले. बालकेशने आरडाओरड केल्याने आरपीएफ समाधान वाहूलकर, रोषन जमीर, दीपक शिरसाठ, विनोद ठाकूर संजय सिंग यांनी पळून जाणाऱ्या सुकेंदर पटेल (रा. बटिया, तहसील रामपूर, सतना, मध्य प्रदेश) संशयितास पकडले. त्याची चौकशी केली असता, त्याने प्रेम नारायण ऊर्फ सोनू शंकरलाल गौर (रा. बालागंज, शिवारे कॉलनी, होशंगाबाद, मध्य प्रदेश) याची माहिती दिली. त्यावरून आरपीएफच्या जवानांनी फलाट क्रमांक सहावर प्रेम नारायण याला ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांची आरपीएफ निरीक्षक विनोदकुमार लांजीवार यांनी चौकशी केली. दोन्ही संशयितांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनोळखींपासून सावध राहा
प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून चहा अथवा खाद्य पदार्थ घेऊ नका. संशय आल्यानंतर प्रवाशांना, पोलिसांना माहिती द्या. आनंद महाजन, पोलिस निरीक्षक, जीआरपी