आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहराचा आयकर वाढला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कमी उत्पन्न दाखवून कर चुकवेगिरी करणारे व्यापारी, उद्योजक, दुकानदारांना शोधून त्यांच्याकडून या अर्थिक वर्षात तब्बल 20 कोटींचा महसूल आयकर रूपाने वसूल करून जळगाव आयकर विभागाने एक नवा उच्चांकच स्थापित केला आहे. तर कोट्यवधींची मालमत्ता असूनही कोणताही कर न भरणा-या छुप्या मालमत्ताधारकांकडून 84 लाखांचा वेल्थ टॅक्स वसूल करून केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात वाढ केली आहे. जिल्ह्यातील वाळू ठेकेदार, इस्टेटब्रोकर यांच्या उत्पन्नाची प्रथमच गुप्त पद्धतीने तपासणी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर आयकराच्या महसुलात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.
धडाकेबाज कामकाजाद्वारे जळगाव आयकर विभागाने गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या भांडवलदार वर्गात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. विशेषत: व्यापारी, उद्योजक, मोठे दुकानदार, व्यावसायिकांच्या उत्पन्नाची व आर्थिक उलाढालीची अचानक तपासणी करण्यात आली. त्यात त्यांनी कागदोपत्री दाखविलेले उत्पन्न आणि प्रत्यक्ष आर्थिक उलाढाल यात मोठी तफावत आढळून आली. अशा दुकानदार, व्यापारी, उद्योजकांवर आयकर लागू करून तो वसूलही करण्यात आला. आयकर विभागाकडून गेल्या 10 वर्षांत अशी कारवाई झाली नव्हती. कर चुकवेगिरी करणा-यांना कारवाईच्या माध्यमातून उघडे पाडल्याने त्यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता मुकाट्याने कर भरला हे विशेष. त्यामुळे अवघ्या सहा महिन्याच्या कारवाईने आयकरात 20 कोटी रुपयांची वाढ झाली. मुळात पूर्णवेळ व्यापार करणारे व आयकर वाचविता यावा म्हणून कृषीचे उत्पन्न दाखविणा-यांनाही या विभागाने प्रथमच उजेडात आणले.
या वर्षाच्या कर वसुलीसंदर्भात आयकर विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र, विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातून वर्ष 2010 मध्ये ९5 कोटींचा महसूल आयकर विभागाला मिळाला होता. तर एप्रिल 2011 ते डिसेंबर 2011 या वर्षात 126 कोटी 20 लाख एवढा आयकर वसूल झाला आहे. तसेच गेल्या वर्षी 31 लाखांचा महसूल मालमत्ता (वेल्थ टॅक्स) करापासून मिळाला तर या वर्षी 1 कोटी 15 लाख रुपये वेल्थ टॅक्स वसूल झाला आहे.