आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता करापोटी आतापर्यंत पाच कोटींची वसुली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार आतापर्यंत 40 कोटींपैकी पाच कोटींची वसुली करण्यात आली आहे. वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महापालिकेला जकातीनंतर मालमत्ता कर, पाणीपट्टीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होते.
महापालिकेच्या हद्दीत खासगी व अतिक्रमण मिळून सुमारे 71 हजार 588 मालमत्ताधारक आहेत. शहरातील मालमत्तांचे 1992-93 नंतर पुनर्मूल्यांकन करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर 1996-97, 2001-2002, 2004-05 या वर्षात केवळ नवीन बांधकाम झालेल्या मालमत्तांवर कर आकारणीची कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या हद्दीत मालमत्ताधारकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील कोणत्या भागात किती मालमत्ताधारक आहेत याची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून पुनर्मूल्यांकनाचे काम सुरू केले आहे.
मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मालमत्ताधारकांकडून कराची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. शंभर टक्के कर वसुली झाली तर महापालिकेला सुमारे 40 कोटींचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते, अशी माहिती महापालिकेच्या वसुली विभागातर्फे देण्यात आली. आतापर्यंत मालमत्ता करापोटी सुमारे पाच कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या वसुली विभागात झालेल्या अग्निकांडात अनेक कागदपत्रे खाक झाल्याने मालमत्ताधारकांना मागणी बिले वाटप करण्यास यंदा उशीर झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वसुलीवर झाल्याची स्थिती आहे. त्यानंतरही उर्वरित अडीच महिन्याच्या काळात सुमारे 50 टक्के वसुली करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. आतापर्यंत 70 टक्के मागणी बिलांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मालमत्ता कराची थकबाकी न भरणा-या मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे आयुक्त हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष वसुली पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती वसुली अधीक्षक नंदू बैसाणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
तर मालमत्ता होतील सील - थकबाकीदारांनी मालमत्ता कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वसुली विभागाने केले आहे. थकबाकी न भरणा-यांची प्रसंगी मालमत्ता सील करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. कारवाई होऊ नये, यासाठी कर भरावा.