आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांनी जोडून सुट्या घेतल्याने कार्यालयांत शनिवारी होता शुकशुकाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पंधरा ऑगस्टच्या शासकीय सुटीला इतर दोन सुट्या लागून येण्याचा योग जुळून आलेला असताना मध्येच ‘शनि’वार अडसर ठरल्याने नाईलाज म्हणून अनेक जण मुकाट कार्यालयात आले होते. पुढच्या आठवड्यात तीन दिवस सलग सुटी मिळणार असल्याने आपसात तडजोडीने सलग सुट्यांची सहकार्‍यांमध्ये जुळवणी केल्याचे चित्र शनिवारी शासकीय कार्यालयांमध्ये बघायला मिळाले.
स्वातंत्र्य दिन, रविवार आणि गोकुळाष्टमी अशा सलग सुट्यांमध्ये शनिवार आला. तर पुढच्या आठवड्यात 23 ऑगस्टला चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी पोळ्याची सुटी आहे. एकाच पंधरवड्यात दोन वेळा सलग सुट्या आल्यामुळे कार्यालयीन सहकार्‍यांनी एकमेकांना सहकार्य करून या सुट्यांची अँडजस्टमेंट केली आहे. 1 ऑगस्टपासून आठवडाभर संपावर असलेल्या महसूल कर्मचार्‍यांची सुट्या घेण्याची संख्या कमी आहे. तापी पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम आणि इतर अडगळीतील नागरिकांशी फारसे संबंधित नसलेले विभाग मात्र सुटीच्या मूडमध्ये होते. जिल्हाधिकारी कार्यालयात 320 अधिकारी, कर्मचार्‍यांपैकी 30 जण रजेवर आहेत. दोन अधिकार्‍यांनी रजा टाकली होती.
स्वातंत्र्यदिनाच्या सुटीनंतर शनिवार सोडता पुन्हा दोन दिवस जोडून सुटी आल्याने पालिका आयुक्तांसह बाहेरगावच्या अधिकार्‍यांनी शनिवारची रजा टाकून कुटुंबासाठी वेळ दिला. शनिवारी आयुक्त संजय कापडणीस, नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम, मुख्य लेखापरीक्षक सुभाष भोर, नगरसचिव निरंजन सैंदाणे नव्हते. उपायुक्त अविनाश गांगोडे, प्रदीप जगताप मात्र हजर होते. जिल्हा परिषदेतही या सलग सुट्यांचा परिणाम दिसून आला. शुक्रवारच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुटीनंतर शनिवारी जिल्हा परिषदेत सुमारे 35 टक्के कर्मचारी गैरहजर होते. एकुणच सगळ्या शासकीय कार्यालयात शनिवारी शुकशुकाट दिसून आला.
जिल्हा परिषदेत सर्वच विभागात उपस्थिती नगण्य

शनिवारी जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये कर्मचारी उपस्थिती ही नगण्य होती. प्रत्येक विभागात निश्चित संख्येपेक्षा निम्याहून कमीच संख्याच दिसून आली. कर्मचार्‍यांबरोबरच अधिकारी वर्गानेही ही संधी सोडली नाही. शुक्रवारनंतर शनिवारची रजा व सोमवारची गोपाळकाल्याची सुटी यामुळे चारही दिवसांचा आनंद लुटण्याचे नियोजन अनेकांनी आधीच करून घेतले होते. यात बाहेरगावाहून येणार्‍या कर्मचार्‍यांचे प्रमाण अधिक होते. तर शहरात वास्तव्यास असलेल्या बहुतांश कर्मचार्‍यांनी सकाळी हजेरी लावून दिवसभर बाहेर राहून आपली कामे साधली.