जळगाव- भारत हा प्रकाशाचे पूजन करणारा देश आहे. स्वातंत्र्यानंतर आजही खर्या अर्थाने स्वराज्याची वाट पाहणार्या देशाला समजण्यासाठी गांधींना समजून घेतले पाहिजे. गांधींना समजण्यासाठी धर्मपालांना समजून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.
विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे सुयोग कॉलनीतील प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानात ‘धर्मपाल यांच्या समग्र साहित्याचा परिचय’ या विषयावर ते बोलत होते. सर्जेराव ठोंबरे यांनी भारताला स्वातंत्र मिळाले मात्र, व्यवस्थेच्या माध्यमातून परिवर्तन झाले नसल्याचेही सांगितले. प्रा.शरदचंद्र छापेकर, दत्तात्रय पदे उपस्थित होते. गिरीश कुलकर्णी यांनी परिचय केला. शुभदा नेवे यांनी सूत्रसंचालन केले.
नक्कल करण्याचे काम सुरू
स्वातंत्र्याच्या बाबतीत देशात निराशेची अवस्था आहे. असे चित्र असले तरी या अडीच वर्षात देशातील चित्र बदलते आहे. स्वातंत्र्यानंतर विकासाच्या नावे दुसर्या देशांची नक्कल करण्याचे काम सुरू आहे. देशात बदल घडवून आणणारे नागरिकच आहेत. अन्य छोटी छोटी राष्ट्रे स्वाभिमानाने उभी राहत आहेत. मात्र, देशाच्या नावातच नाही तर स्वाभिमान कसा हा प्रश्नही सद्य:स्थितीत उपस्थित झाला आहे, असे कानिटकर यांनी सांगितले.