आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway News In Marathi, Divya Marathi, Delhi

रेल्वे कर्मचा-यांच्या हजेरीची दिल्लीत नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील कर्मचा-यांची हजेरी आता थेट दिल्ली मुख्यालयात नोंदवली जाणार आहे. त्यासाठी डीआरएम कार्यालयात ‘थम्ब इम्प्रेशन’ मशीनऐवजी ‘बायोमेट्रिक’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. काही सेकंद या मशीनसमोर
उभे राहिल्यास ‘फेस रीडिंग’ तंत्रज्ञानाद्वारे कर्मचा-यांची हजेरी नोंदवली जाणार आहे.

ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कर्मचा-यांचा डाटा संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. आॅक्टोबर महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. डीआरएम कार्यालयातील विविध विभागांमधील कर्मचा-यांची हजेरी नोंदवण्यासाठी यापूर्वी थम्ब इम्प्रेशन मशीनचा वापर केला जात होता. या मशीनवर अंगठ्याच्या ठशानुसार हजेरीची नोंद केली जात होती. मात्र, या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याने बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याचा निर्णय कार्मिक विभागाने घेतला आहे.

अशी होणार नोंद
डीआरएम कार्यालयात सकाळी ९.३० वाजता येणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांना हजेरी नोंदवण्यासाठी केवळ मशीनसमोर उभे राहावे लागेल. एका सेकंदात कर्मचा-याची हजेरी अत्याधुनिक प्रणालीद्वारे थेट दिल्ली मुख्यालयात नोंदवली जाईल. यासाठी चार मशीन डीआरएम कार्यालयात, तर दोन मशीन अकाउंट विभागात लावल्या जाणार आहेत.

नागपूर विभागात सर्वप्रथम वापर
मध्य रेल्वेचे मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ असे पाच विभाग आहेत. यापैकी नागपूर विभागात सर्वप्रथम ‘बायोमेट्रिक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता भुसावळ विभागात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व विभागांत ही यंत्रणा लावली जाणार आहे. भुसावळ विभागात यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आठ बायोमेट्रिक मशीनचे कोटेशन मागवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सहा मशीन लावल्या जाणार असून अधिका-यांसाठी एक स्वतंत्र मशीन असेल. एका मशीनची किंमत ३५ हजार रुपये आहे.