जळगाव - मुंबईला जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना आरक्षण अधिकार्याच्या उद्दामपणाचा अनुभव येण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. चुकीचे तिकीट दिल्याचे लक्षात आणून दिल्याने प्रवाशाला अरेरावी व शिवीगाळ केल्याने रविवारी सकाळी रेल्वेस्थानकावर प्रचंड गोंधळ झाला. संबंधितांविरुद्ध लेखी तक्रार करण्यात आली आहे.
भूपेश व नीलेश कुळकर्णी हे दोघे रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी तासाभरापासून रांगेत उभे होते. तिकिटासाठी नंबर लागताच त्यांनी जळगाव ते मुंबई प्रवासासाठी पंजाब मेलची दोन तिकिटे आरक्षित करण्यासाठी भरलेला फॉर्म दिला. मात्र, आरक्षण अधिकारी के.डी.पाटील यांनी फॉर्ममधील माहितीनुसार तिकीट न देता विदर्भ एक्स्प्रेसचे तिकीट हातात दिले. झालेली चूक पाटील यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी दोघांशी अरेरावी करत शिवीगाळ केली. तसेच तिकीट परत घेत आरक्षण रद्द करून टाकले. त्यामुळे या प्रवाशांना 60 रुपयांचा भुर्दंड तर सहन करावा लागलाच परंतु नव्याने तिकीट न देता पुन्हा रांगेत उभे राहून शेजारच्या खिडकीतून तिकीट घ्या, असे सांगितल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप होऊन प्रचंड गोंधळ उडाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते असलेले कुळकर्णी यांनी घडलेला प्रकार शहर सरचिटणीस नितीन इंगळे यांना कळवल्यानंतर दोषी कर्मचार्यावर कारवाई करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. लेखी तक्रार घेण्यास देखील कोणीही तयारी दाखवत नव्हते. अखेर संबंधित महिला अधिकार्याने तक्रार स्वीकारून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
तणावाचे वातावरण
रेल्वेचे आरक्षण मिळणे म्हणजे मागच्या जन्माचे पुण्य कामी आले अशाच भावना व्यक्त होतात. त्यातच तासन्तास रांगेत उभे राहणार्या प्रवाशांना अधिकारी, कर्मचार्यांच्या भोंगळ कारभाराला तोंड द्यावे लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कारवाईसाठी पाठपुरावा करणार
रेल्वे आरक्षणावेळी प्रवाशांना नेहमीच अधिकार्यांच्या उद्दामपणाचा सामना करावा लागतो. मार्गदर्शन तर सोडाच पण योग्य पद्धतीने कामही होत नसल्याचा हा नुमना आहे. अरेरावी व शिवीगाळ करणार्या कर्मचार्याविरुद्ध तक्रार केली आहे. कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर तक्रार करून पाठपुरावा करणार आहोत. नितीन इंगळे, सरचिटणीस, भाजयुमो महानगर