जळगाव- ‘अाता यापुढे मी निवडणूक लढवणार नाही’ असे वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री सुरेश जैन यांनी दुसऱ्याच दिवशी घुमजाव केला. अापण लाेकसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणूक लढवू शकताे. फक्त विधानसभा लढवणार नाही, तसेच राजकारणातून संन्यास घेतलेला नाही,’ असा खुलासा त्यांनी साेमवारी वृत्तवाहिनीशी बाेलताना केला.
रविवारी जैन यांनी अापल्या राजकीय भूमिकेबाबत प्रथमच माैन साेडले हाेते. ‘जळगावकरांनी मला भरभरून प्रेम दिले. नऊ वेळा अामदार केले. अाता यापुढे मी निवडणूक लढवणार नाही.’ असे सुरेश जैन यांनी जाहीर केले. मात्र साेमवारी एका वृत्तवाहिनीशी बाेलताना सुरेश जैन म्हणाले, की ‘ विधानसभेत नऊ वेळा मी निवडून गेलाे अाहे. यामुळे पुन्हा विधानसभेत जाण्याची इच्छा नाही. लाेकसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणूक मी लढवू शकताे.
सुरुवातीपासून माझी लाेकसभेत जाण्याची इच्छा हाेतीच. सध्यातरी काेणत्याही निवडणुकीची तयारी मी सुरू केलेली नाही. कालच्या माझ्या विधानाचा प्रत्येक जण साेईने अर्थ काढत अाहे. पण मी शिवसेनाचा अाजही सदस्य अाहे अाणि राजकारणातून संन्यासही घेतलेला नाही.’