आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये मिळते अजिंठा, वेरूळची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- जपानमधील ‘कोयासान’ प्रांत आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत भारतातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांची माहिती जपानमधील विद्यार्थी आणि नागरिकांना उपलब्ध करून दिली जात आहे. जपानच्या ‘वाकायामा’ प्रांतातील तनाबे सिटीमधील कुमानो होंगू हेरिटेज सेंटरमध्ये भारतातील अजिंठा आणि वेरूळ लेणींची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. 
  
जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धनात स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासंदर्भात जपान सरकारतर्फे नुकताच नऊ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात पुणे येथील ‘फ्रेंड्स ऑफ जपान’या संस्थेचे अध्यक्ष समीर खळे यांनीही सहभाग नोंदवला. प्रशिक्षणात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तसेच वाकोद (ता.जामनेर) येथील शिक्षक नितीन पाटील यांच्यासह एकूण १८ जणांच्या शिष्टमंडळाने सहभाग नोंदवला. ६ ते १४ जानेवारी या काळात शिष्टमंडळाने जपानचा दौरा केला. 

पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.के.एच.गोविंदराज, सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी तसेच उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांचाही दौऱ्यात समावेश होता.

बौद्ध धर्माची पार्श्वभूमी   
जपानमधील कोयासान भागात ‘कुमानू होंगू तायशा ग्रँड श्राइन’ही १२०० वर्षांपूर्वीची बुद्धांची लाकडी मंदिरे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहेत. या मंदिरांमधील कलाकुसर अजिंठा आणि वेरूळ लेणींशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे जपान सरकारने भारतातील या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. सामंजस्य करारानुसार जपानमधील नागरिकांना भारतातील पर्यटनस्थळांची तर भारतातील नागरिकांना जपानमधील ऐतिहासिक बौद्ध वारसास्थळांची माहिती दिली जात आहे. जपानी पर्यटकांना भारतात येऊन अजिंठा-वेरूळ लेणी पाहता यावीत यासाठी सर्व इत्थंभूत माहिती फलकावर देण्यात आली. लेणींची निर्मिती केव्हा झाली, कुठल्या खडकापासून या लेणी बनल्या आहेत, तेथे कसे जायला हवे आदी माहिती फलकावर दिली गेली आहे. वेरूळ येथील लेणी क्र. १६ कैलास लेणीबद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे.

अभ्यासाची संधी   
जपानमधील संस्कृतीची पर्यटकांना ओळख व्हावी म्हणून जपान सरकारतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने जपानचा दौरा केला. दौऱ्यात जपान,भारत या देशांना जोडणाऱ्या पर्यटनस्थळांच्या अभ्यासाची संधी मिळाली. 
- समीर खळे, अध्यक्ष, फ्रेंड्स ऑफ जपान संस्था, पुणे  

सहभाग वाढणार   
अजिंठा आणि वेरूळ या जागतिक पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग कशा प्रकारे वाढवता येईल, याचे उत्तम प्रशिक्षण जपानच्या दौऱ्यात मिळाले. तसेच जपानी आदरातिथ्याची पद्धत जवळून अनुभवता आली.   
- डॉ.मुकेश कुळकर्णी, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई 
बातम्या आणखी आहेत...