आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inquiry Committee Formed For Bogus Ration Card Case

बनावट रेशनकार्ड प्रकरणाची चौकशी; द्विसदस्यीय अधिकार्‍यांची समिती नियुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळात तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे सात रेशनकार्ड गेल्या महिन्यात आढळले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आता द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

विल्हाळे येथील काही नागरिक रेशनचे धान्य मिळत नाही, म्हणून ऑगस्ट महिन्यात 1 तारखेला तहसील कार्यालयात गेले होते. त्यांच्याकडील रेशनकार्डची पाहणी केली असता सात लाभार्थ्यांकडील कार्डांवर तहसीलदारांची कार्बन कॉपीची स्वाक्षरी आढळली होती. त्यामुळे तहसीलदार वैशाली हिंगे यांनी हे रेशनकार्ड ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी त्यांनी तेव्हा पाच सदस्यांची समिती नियुक्त केली होती. त्यात पुरवठा निरीक्षक एफ. के. जमादार, राजीव जामोदकर, एस. यू. पाटील, नीलेश कोलते, पी. एम. नारखेडे यांचा समावेश होता.

समितीने पुरवठा विभाग आणि सेतू सुविधा कक्षातील कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले होते. त्यानंतर महसूल कर्मचारी संघटनेतर्फेही याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांची दखल घेऊन आता बोगस रेशन कार्डप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. समितीत भुसावळचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे व उपजिल्हाधिकारी साधना सावरकर यांचा समावेश आहे.

तहसीलमधील दलालांचे धाबे दणाणले
भुसावळ तहसील कार्यालयात बनावट रेशनकार्ड तयार करून देणारी टोळीच कार्यरत असल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख नारायण कोळी यांनी केली होती. एवढेच नव्हे तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे या प्रकरणाकडे खर्‍या अर्थाने गांभिर्याने पाहिले गेले. आता तर थेट जिल्हाधिकार्‍यांनी द्विसदस्यीय अधिकार्‍यांची समिती नियुक्त केल्याने दलालांचे धाबे दणाणले आहे. चौकशीअंती काय निष्पन्न होते? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.