आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती विटंबना; दोंडाईचात तणाव वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोंडाईचा - शहरातील सिंधी कॉलनीत असलेल्या महादेव मंदिरातील मूर्तींची काही अज्ञात व्यक्तींकडून विटंबना करण्यात आली. या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिकांची मंदिर परिसरात गर्दी झाली. तसेच शंभर, दीडशे लोकांचा जमाव पोलिस ठाण्यामध्ये आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी ठिय्या मांडून बसल्याने तणावात भर पडली. घटनेनंतर धुळे येथून पोलिसांचा स्वतंत्र फौजफाटा बंदोबस्तासाठी पाठवण्यात आला आहे.
दोंडाईचा येथे शहादा मार्गावर असलेल्या सिंधी कॉलनीत अनेक वर्षे जुने नीळकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात गणेश, शंकर, पार्वतीसह नंदीची मूर्ती आहे. सोमवारी दुपारी ते वाजेदरम्यान अज्ञात लोकांकडून गणेशमूर्ती वगळता इतर तीन मूर्तींच्या तोडफोडीची घटना घडली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सिंधी कॉलनीसह स्टेशन भागातील अनेक जण मंदिर परिसरात जमा झाले. जवळपास दोन ते तीन हजार नागरिक जमा होऊन त्यांच्याकडून मूर्तींच्या तोडफोडीबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात आली. काही वेळेत पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. गावातील विविध भागातून नागरिक सिंधी कॉलनीत येत असल्याने पोलिस निरीक्षक जाधव यांनी याची माहिती शिरपूरचे डीवायएसपी प्रकाश सैंदाणे यांना दिली. त्यांनीही सायंकाळी दोंडाईचा येथे भेट दिली. तोपर्यंत सिंधी समाजासह काही राजकीय व्यक्तींकडून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. दोषींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करीत दीडशे ते दोनशे जणांनी ठिय्या आंदोलन केले, अशी माहिती सिंधी समाजाचे माजी नगरसेवक किशन दोधेचा यांच्याकडून देण्यात आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. मात्र रात्री आठ वाजेनंतर गावात परिस्थिती नियंत्रणात होती. अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन राजकीय, सामाजिक कार्यकर्ते पोलिसांकडून करण्यात येत होते.

श्वानपथका मार्फत आरोपींचा शोध...
मूर्तीविटंबना करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी धुळे येथून पोलिसांचे खास श्वानपथकही सायंकाळी दोंडाईचात दाखल झाले. त्यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.