आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत व्यक्तीच्या नावाने विमा काढून 35 लाख लाटण्याचा डाव उधळला; दोन जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मृत व्यक्तीच्या नावाने विमा पॉलिसी काढून त्याचा पैसा लाटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. मुंबई, मध्य प्रदेश तसेच   जळगाव शहर या बनावट विमा पॉलिसीज काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे  केंद्र असल्याचे उघड झाले असून मुंबई पोलिस व जळगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोन भामट्यांना अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी मलकापूर येथील एका मृत व्यक्तीच्या नावाने पॉलिसी काढून ३५ लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न सुरू केला होता. 

 
मलकापूर येथील सुरेश सुशीर यांचे ४ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले. परंतु  सुशीर यांच्या नावाने २३ डिसेंबर २०१४ रोजी मुंबईत एका खासगी विमा कंपनीतून  ३५ लाखांचे सुरक्षा कवच असलेली पॉलिसी काढण्यात आली. मृत्यूनंतर १९ दिवसांनी सुशीर यांनी विमा काढण्यात आला होता. त्यानंतर पुढील कागदपत्रांची पूर्ततादेखील सुरू करण्यात आली होती. मलकापूरच्या व्यक्तीची पॉलिसी मुंबईतून काढण्यात आल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे  कंपनीने  भोईवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून संशयितांचा तपास सुरू होता. शुक्रवारी भोईवाडा ठाण्याचे एक पथक मध्य प्रदेशात दाखल झाले. तेथून त्यांनी अजयसिंग राजपूत याला ताब्यात घेतले. राजपूतने दिलेल्या माहितीवरून मुंबई पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले. तेथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू झाली. जळगावच्या कंजरवाडा भागातील  रहिवासी  राजू श्रावण गागडे याला  ताब्यात घेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच  शाहूनगर भागातील त्याचा  अन्य  एका साथीदार याला खबर लागल्याने तो  शहरातून बेपत्ता झाला. त्यामुळे राजपूत व गागडे या दोघांना  घेऊन पोलिस पथक शुक्रवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले. 

 

शहरातील दारुड्यांच्या पॉलिसी काढल्या   
शहरातील दररोज दारू पिणाऱ्या काही अट्टल व्यसनाधीन व्यक्तींच्या पॉलिसी काढून ठेवलेल्या असल्याची खळबळजनक माहितीही मुंबई पोलिसांनी दिली. या मद्यपींना मोफत दारूदेखील दिली जाते. अति मद्यसेवनामुळे व्यसनाधीन व्यक्तीचा  मृत्यू होण्याची अधिक शक्यता असल्याने  त्यांची  महत्त्वपूर्ण कागदपत्रेही  संबंधित टोळीकडे जमा असतात. त्यांच्या पॉलिसींचे हप्तेदेखील नियमित भरले जात आहेत.

 

सुशीर यांच्या मृत्यूनंतर भरले चार हप्ते   
सुशीर यांच्या मृत्यूनंतर भामट्यांनी त्यांची विमा पॉलिसी काढली होती. मात्र,  त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहितीदेखील नव्हती. भामट्यांनी पॉलिसी नियमित सुरू असल्याचे भासवण्यासाठी सहा हजार रुपयांचे प्रत्येकी चार हप्तेदेखील भरले. २४ हजार भरल्यानंतर त्यांनी सुशीर यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले. याच प्रमाणपत्राच्या साहाय्याने ३५ लाख रुपयांचा विमा लाटण्याच्या तयारीत ते होते.

 

अशी आहे टोळीची मोडस ऑपरेंडी    
एखादी व्यक्ती आजारी असल्यास रॅकेटमधील सदस्य सुरुवातीला त्याची कौटुंबिक माहिती गोळा करते. एक टीम त्याच्या नावाचे बनावट कागदपत्र तयार करण्याची तयारी सुरू करते सर्व कागदपत्रे गोळा झाल्यानंतर मुंबईत बसलेली एक टोळी त्याच्या नावाचा विमा काढते. अनेक वेळा विमा काढण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, तर काही जण नंतर मरण पावतात. काही हप्ते भरल्यानंतर ही व्यक्ती मरण पावल्याचे सिद्ध करण्यासाठीचे  कागदपत्र गोळा केले जातात आणि विमा कंपनीत दावा दाखल करून रक्कम लाटली जाते. अशा प्रकारे एकाच टोळीतील सदस्य वेगवेगळी जबाबदारी स्वीकारून कामाला लागलेले असतात. मुंबई, मध्य प्रदेशनंतर जळगावात या टोळीचे सर्वाधिक सदस्य आहेत. शुक्रवारी मुंबई पोलिसांना आणखी काही संशयितांची नावेदेखील मिळाली होती. चौकशीअंती हे भामटे बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे.    

बातम्या आणखी आहेत...