आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Internet Service Road Development Issue In Dhule

इंटरनेट सेवेच्या केबलमुळे रस्त्यांची लागतेय ‘वाट’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील विविध भागात एका खासगी मोबाइल सेवा देणार्‍या कंपनीकडून ग्राहकांना इंटरनेटची आधुनिक फोरजी सेवा देण्यासाठी नव्याने केबल वायर टाकण्याचे काम करण्यात येत आहे. ही केबल टाकण्यासाठी अनेक चांगले रस्ते खोदण्यात आल्याने लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची ‘वाट’ लावली जात आहे. याबाबत सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून विविध भागात खड्डे खोदून लाल, पिवळ्या आणि निळ्या रंगाची सुमारे चार इंच जाड असलेली वायर टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला सुमारे तीन ते चार फूट खोल खड्डा करून त्यात ही वायर टाकली जात आहे. सदर वायर एका खासगी मोबाइल कंपनीची आहे. कंपनीकडून भविष्यात ग्राहकांना इंटरनेटसह इतरही अनेक सेवा देण्यासाठी नव्याने ही केबल टाकली जात आहे. शहरातील विविध भागात कंपनीकडून बाहेरगावच्या कामगारांमार्फत हे काम सुरू आहे. त्याबाबत संबंधित कामगारांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत कोणतीही माहिती सांगता येत नाही. ठेकेदाराच्या सांगण्यानुसार आम्ही काम करीत आहोत. वायर कशाची आहे, कोणत्या कंपनीची आहे, किती ठिकाणी वायर टाकली जात आहे याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येते ; परंतु या कामासाठी मोठय़ा प्रमाणावर होणार्‍या खोदकामामुळे मुख्य रस्त्यावर खड्डय़ातील माती फेकली जाते. अनेक ठिकाणी वायर टाकल्यानंतर योग्य पद्धतीने खड्डे बुजवले जात नसल्याने अनेक ठिकाणी उंचवटे तयार झाले आहेत. त्या ठिकाणी वाहने अडकून अपघात होतात.

रस्त्यावरील वायरी पडल्या उघड्यावर
देवपुरासह शहरातील इतर भागात वायर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे ; परंतु त्यापैकी बहुतेक ठिकाणी या वायर एका टोकाला मोकळ्या सोडल्या आहेत. त्या ठिकाणी सुमारे दोन ते तीन फूट वायर बाहेर आहे. त्यामुळेही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्या योग्य पद्धतीने जोडण्यात आलेल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणी वायरींचे मोठमोठे वेटोळे पडलेले आहेत.

मनपाला अडीच कोटींचे उत्पन्न
या कंपनीकडून महापालिका प्रशासनाची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेला दोन कोटी 59 लाख रुपये कराचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला उत्पन्न प्राप्त झाले आहे ; परंतु संबंधित कंपनीकडून कराच्या स्वरूपात उत्पन्न प्राप्त झाले असले तरी संबंधित कंपनी नियमानुसार काम करीत आहे किंवा नाही हे महापालिका प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे.