आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गँगस्टर कॉमन मॅनशी स्वत: बोलत नसतात, त्यांचे प्यादेच बोलतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आहे. त्याचा उजवा हात छोटा शकील अाता सक्रिय आहे. तो कसा दिसतो, याचे साधे छायाचित्रही अनेक दिवसांपासून नाही. मोठे गँगस्टर कधी स्वत: कॉमन मॅनशी बोलत नसतात. त्यांची प्यादीच या बाबत बोलत असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कोण कोणत्या मोबाइल क्रमांकावरून बोलतो, हे कळणे अशक्य असल्याचे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रकट मुलाखतीदरम्यान सांगितले.
व.वा.वाचनालयाच्या १३९व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी ग्रंथदालनाचे अॅड. निकम यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. त्यानंतर कांताई सभागृहात त्यांची ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी खुमासदार शैलीत मुलाखत घेतली. जळगावच्या निमित्ताने दाऊद महाराष्ट्राच्या पटलावर आला. तो कॉमन मॅनला फोन करू शकतो का? असा पहिलाच प्रश्न गाडगीळ यांनी विचारला. त्या वेळी निकम म्हणाले, कसाबला फाशी देण्याचा निर्णय झाल्यानंतर ००१ या अमेरिकेच्या कोड नंबरवरून फोन येत होते. अमेरिकेतून दहशतवाद्यांना मार्गदर्शन केले जात होते. त्या वेळी मी एफबीआयच्या अधिकाऱ्यांशी बोललो. ते व्हाॅइस ओव्हर इंटरनेट कॉल होते. याचा वापर करून दुसऱ्याच्या मोबाइलवरूनही फोन करू शकतो. त्यामुळे ऐकीव माहितीवर मी जळगावच्या प्रकाराबाबत थेट उत्तर देऊ शकत नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले. वकिली करताना मला बऱ्याच वेळा राजकीय दडपण आले. मात्र, त्यांना मी समजून सांगितल्यानंतर ते मान्य करायचे. मी त्यांना एक्सपोज करणार नाही. खटला, केस आणि कोर्टानंतर इतरांचे हास्य बघून माझे मन ताणविरहीत होते. माध्यमांच्या उदात्तीकरणाचा समाजावर काय परिणाम होईल, याचा माध्यमांनी विचार करावा, असे ते म्हणाले. गुंडांच्या मानसिकतेवर बोलताना ते म्हणाले, नगर सामुदायिक दरोडा बलात्कार, शक्ती मिल गँगरेप आदी केसेस लढलो. विशेषत: गँगरपप्रकरणातील आरोपी अतिशय निर्ढावलेले असतात. त्यांना गुन्ह्याचा पश्चाताप वाटत नाही.

राजकारणात येण्याचा अजून बेत नाही
व्यावसायिक यश राजकारण या बाबी वेगळ्या आहेत. माझे वडील ठरवून राजकारणात आले होते. मी अजून राजकारणात येण्याबाबत ठरवलेले नाही, असे उत्तर अॅड. निकम यांनी गाडगीळ यांना मुलाखतीदरम्यान दिले.

पोलिसांनी गुन्हे शोधण्याचे तंत्र सांगू नये
वर्षानुवर्षे गुन्हेगार सापडत नाहीत. त्याला पोलिस कारणीभूत आहेत. गुन्हेगार शोधताना त्यांनी कोणते तंत्र वापरले. त्याबाबत प्रसार माध्यमांतून उघड करून स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये. गुन्हेगारीचे तंत्र बदलले आहे. गुन्हेगार टेक्नोसॅव्ही झाले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. वकिलांनी ठरवले तर न्यायालयीन खटले लांबवू शकत नाहीत. साक्षीदार फुटू शकतात. खटल्यांचे वृत्तवाहिन्यांवर सविस्तर वार्तांकन येऊ नये. खटल्यापूर्वी माध्यमांनी निकाल लावू नये. साक्षीदाराला मुद्दा पटण्यासाठी विनोदाचीही फोडणी कोर्टात द्यावी लागते, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...