आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाडला इस्रायल हल्ल्यांचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - पॅलेस्टाइन गाझा पट्टी भागात व संपूर्ण देशातील निरपराध नागरिकांवर इस्त्रायल तर्फे होणा-याअमानवीय हल्ल्यांच्या निषेधार्थ मनमाड शहरातील मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीय नागरिकांनी बुधवारी शहरातून शांततापूर्ण मोर्चा काढत निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने पॅलेस्टाइन नागरिकांवर होणारे अमानवीय हल्ले थांबवण्यास इस्त्रायलवर दबाव आणावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. पोलिस प्रशासनाला तसे निवेदन देण्यात आले. केजीएन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या शांती मोर्चात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते.

कोर्टरोड येथून या शांती निषेध मोर्चा प्रारंभ झाला. विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व सर्व थरातील नागरिक, मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. काळ्या फिती लावून व काळे कपडे परिधान करून निघालेल्या या मोर्चात पॅलेस्टाइनवरील नागरिकांवर होणा-याहल्ल्याचे निषेध फलक, सेव्ह गाजा, शर्म करो, इन्सानोंको मारना बंद करो, पॅलेस्टाइनवरील हल्ल्यांचा निषेध असो, इस्रायलला आतंकवादी घोषित करा, असे विविध फलक लक्ष वेधून घेत होते. शहराच्या विविध मार्गाने जाऊन एकात्मता चौकात या शांती निषेध मोर्चाचा समारोप झाला. भारत देशात सर्वधर्मीय नागरिक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतात.
एकात्मता, अखंडता, मानवता यामुळे सौहार्दपूर्ण वातावरण असताना पॅलेस्टाइन नागरिकांवर इस्त्रायलकडून हल्ले होत आहे. केंद्र सरकारने इस्त्रायलवर दबाव आणावा, हा प्रश्न युनोच्या सभेत उपस्थित करावा, अशी मागणी जामा मशिदीचे मौलाना अस्लम रिजवी यांनी केली.

सौहार्दतेसाठी सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली दुवा मागण्यात आली. या वेळी पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, विलास अहिरे आदींची या वेळी भाषणे झाली.

नगराध्यक्ष योगेश पाटील, गटनेते बब्बूभाई कुरेैशी, सादीकभाई पठाण, नगरसेवक धनंजय कमोदकर, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, जावेद मन्सुरी, सलीमभाई सोनावाला, विलास कटारे, रफिक शेख, अन्वर सर, विठ्ठल नलावडे, रईस फारूकी आदींसह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. पोलिस निरीक्षक भागवत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.