आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Encroachment In Jalgaon Municipal Corporation

अतिक्रमणावरून महासभेत खडाजंगी, मनसे नगरसेवकांचा सभागृहात थेट अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुप्रीमकाेर्टाच्या अादेशानुसार शहरात अतिक्रमण काढण्याची माेहीम सुरू अाहे. अाेंकारेश्वर मंदिरासमाेरील अतिक्रमण काढण्याच्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या अामदारांनी अधिकाऱ्यांना फाेन करून हस्तक्षेप केला. अायुक्तांवर दबाब अाणला. या विषयावर महासभेत चांगलीच खडाजंगी झाली. याप्रकरणी खान्देश विकास अाघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी अाराेप करून जाेरदार चर्चा घडवून अाणली.

शहरातील अतिक्रमण हाॅकर्सचे स्थलांतर हा अायत्यावेळी अालेला विषय शनिवारी महासभेत प्रचंड गाजला. मनसेचे नगरसेवक अनंत जाेशी यांनी संतप्त भावना व्यक्त करीत या विषयाला हात घातला. अामदार गुरूमुख जगवानी सुरेश भाेळे यांनी अायुक्त संजय कापडणीस यांच्यासह अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांना फाेन करून दबाव टाकला. तर दुसरीकहे अायुक्त कापडणीस यांनी अामदारांच्या दबावास बळी पडून संबंधिक अधिकाऱ्यांची दप्तर तपासणी केली असा थेट त्यांनी अाराेप केला. तसेच या प्रकरणाची सीडी पुढील महासभेत दाखवणार असा दावा जाेशी यांनी केला.

हॉकर्स स्थलांतरासाठी तयार आहेत. नगरसेवकही याबाबतीत सकारात्मक विचार करीत आहेत. मात्र, आमदार जगवाणी भोळे यांनी विशिष्ट लोकांसाठी दबाव टाकला. हॉकर्स स्थलांतराची प्रक्रिया वेगाने होत नसल्यामुळे त्यात राजकारण शिरते आहे. हॉकर्सला देण्यात आलेल्या पर्यायी जागांवर सुविधा पुरवण्यात पालिका विलंब करते आहे. त्यामुळे हाॅकर्सच्या मनात नगरसेवकांविषयी द्वेष निर्माण होत आहे. पर्यायी जागांवर हॉकर्सला बसू देण्यासाठी परिसरातील नागरिक विरोध करतीलच, ट्रॅफिक गार्डनमध्ये दारू, गांजा ओढला जातो. ते सहन होते, पण हॉकर्स नको असे होते. ‘आम्ही खलनायक आहोत,’ अशी भावना हॉकर्सच्या मनात तयार होत आहे. मात्र, आम्ही त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सभागृहात गेल्या दोन महिन्यांपासून भांडतो आहाेत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, असेही जोशी यांनी सांगितले.
तसेच माजी नगरसेवक शरच्चंद्र लाठी यांनीदेखील अतिक्रमण केले असून ते काढावे, अशी विनंती सपकाळे यांनी केली. उज्ज्वला बेंडाळे यांनी जिल्हाधिकारी निवासस्थान ते गिरणाटाकी परिसरातील अतिक्रमणावर लक्ष वेधले. या महासभेत भूसंपादन इसारा रक्कम परत देण्याच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.

अायुक्त पंटरकी करताहेत
नगरसेवक कैलास सोनवणे यांनीही अतिक्रमण काढणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची आयुक्तांनी झडती का घेतली? त्यांनी चोरी केली की हप्ते जमा केले? असे प्रश्न उपस्थित केले. यावरून आयुक्त कापडणीस हे पंटरकी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जीवाची पर्वा करता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षीस देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला.

एलबीटी अनुदानातून विकासकामांना प्राधान्य द्या
महापालिकेला मिळणाऱ्या एलबीटी कराच्या अनुदानात महिन्याकाठी दीड कोटी रूपयांची वाढ झालेली आहे. या पैशांतून शहरातील अंतर्गत रस्ते तसेच विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी या वेळी व्यक्त केली. जोशी यांनी आमदार सुरेश भोळे यांच्यासंदर्भात केलेले आरोपही नगरसेवक सोनवणे यांनी या वेळी फेटाळले.

गाळेप्रकरणी दंड माफ करण्याची विनंती
सध्या सुरू असलेल्या गाळे प्रकरणात गाळेधारकांना आकारण्यात आलेल्या पाचपट दंडाची रक्कम माफ करावी, अशी विनंती अश्विन सोनवणे यांनी केली. तर या प्रकरणात पालिका प्रशासनाने धोरणात्मक बाब स्पष्टपणे मांडावी, अशी अपेक्षा लढ्ढा यांनी व्यक्त केली.

लाइट विभाग धिम्म
शहरात लाइट विभाग धिम्म गतीने काम करतो. अनेक प्रभागात नगरसेवकांना स्वखर्चाने पथदिवे खरेदी करावे लागतात. लाइट विभागाचे कर्मचारी प्रभागात फिरत नाहीत. पालिका कर वेळेवर घेते, मग काम करण्यासाठी पैसे नाहीत, असे उत्तर नागरिकांना का दिले जाते, असा आरोप नगरसेवक अमर जैन यांनी केला. त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिले.

महापालिकेच्या सभागृहात अायाेजित केेलेल्या महासभेत प्रश्न उपस्थित करताना नगरसेवक.
स्व.हेमंत पाटील यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत करा

नगरसेवकांना गेल्या अडीच वर्षांपासून मानधन मिळालेले नाही. आमदार, खासदार सर्वांचेच मानधन वाढले आहे. मग नगरसेवकांनी मागितले ते योग्यच आहे, असे ‘खाविआ’चे नितीन लढ्ढा यांनी सांगितले. स्वर्गीय पत्रकार हेमंत पाटील यांच्या कुटुंबीयांना नगरसेवकांच्या एका महिन्याचे मानधन देण्याचा ठराव होऊनही अद्याप पैसे मिळाल्याच्या विषयावरून सभागृहात वातावरण तापले होते. लढ्ढा यांच्यासह मिलिंद सपकाळे, अनंत जोशी, कैलास सोनवणे आदींनी पाटील यांच्या कुटुंबीयांना लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली. तर काही नगरसेवकांना थकित मानधन द्यावे, अशी विनंती सोनवणे यांनी केली. तर एप्रिलपासून नगरसेवकांना १५ हजार रुपये महिना मानधन मिळावा, असा ठराव मंजूर केला.

शाैचालयांच्या सफाईचा ठेका
महासभेच्या पहिल्याच विषयात नवल फाउंडेशनच्या सफाई ठेक्यावरून चर्चा झाली. शहरातील सार्वजनिक शाैचालयालगत अतिक्रमण असल्यामुळे पाण्याची गाडी तिथपर्यंत पोहाेचत नाही. तर १२ ठिकाणी बोअरिंग बंद आहे, असा अहवाल प्रशासनाने सादर केला. यावर जर पाणीच उपलब्ध होत नसेल तर संबंधित ठेका देऊन महापालिकेचे आर्थिक नुकसान का करून घेतले जात आहे, असे मत नगरसेवक मिलिंद सपकाळे यांनी मांडले. तर शहरात सर्वत्र सफाईचे बारा वाजले आहेत. नागरिकांची ओरड वाढली आहे. कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीत म्हणून ते ड्यूटीवर येत नाहीत. तेव्हा पालिकेने त्यांचे पगार अदा करून सफाईच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे भाजपचे गटनेते अश्विन सोनवणे यांनी सांगितले.