आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार दंगलखोरांवर, विशिष्ट गटासाठी नाही, पोलिस अधिकाऱ्यांनी दिली चौकशीदरम्यान माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील मच्छीबाजार चाैकात झालेल्या दंगलीवेळी गोळीबार करण्याचा आदेश दंगलखोरांना पांगवण्यासाठी देण्यात आला होता. कोणत्या विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यासाठी हा आदेश देण्यात आला नव्हता. शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने हा आदेश दिला हाेता. तत्पूर्वी जमावाला समजावण्याचे प्रयत्न करण्यात आले. तसेच संचारबंदी लागू करत असल्याची घोषणा केली होती, अशी माहिती पोलिस अधिकारी घनश्याम पाटील एसआरपीचे निरीक्षक हिरालाल वाघ यांनी चौकशीदरम्यान दिली.

येथील मच्छीबाजार भागात जानेवारी २०१३ रोजी दंगल उसळली होती. या प्रकरणाची सध्या न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारी नाशिकचे उपअधीक्षक तथा दंगलीच्या वेळी धुळ्यात असलेले पोलिस अधिकारी घनश्याम पाटील एसआरपीचे निरीक्षक हिरालाल वाघ यांची अॅड.हिरे यांनी सरतपासणी घेतली.

या वेळी त्यांनी सांगितले की, दंगल सुरू झाल्यावर जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी अश्रुधूर नळकांडेही फोडण्यात आले. त्यामुळे जमावातील काही जण पांगले; परंतु या भागाला लागून असलेल्या गल्लीमधून पुन्हा जमाव चालून येत होता. त्यांच्याकडे दगड-विटा होत्या. काही वेळाने प्रांताधिकारी डाॅ. नंदकुमार बेडसे घटनास्थळी आले. त्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे संचारबंदी लागू करत असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यानंतरही जमाव नियंत्रणात आला नाही. त्यामुळे हवेत गोळीबार केला. १६ राउंड झाडण्यात आले; परंतु हा गोळीबार कोणत्याही गटाला लक्ष्य करण्यासाठी नव्हता, तर दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी होता, असेही म्हणाले. या वेळी पाटील यांनी शस्त्रसाठा, वरुण अस्त्र पवन व्हॅनची माहिती दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दंगलीची चौकशी सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची साक्ष
याप्रकरणाचे पुढील कामकाज दि.२९ दि.३० राेजी होणार आहे. बुधवारी पोलिस अधिकाऱ्याची, तर गुरुवारी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, प्रांताधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे अाणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहन पवार यांची साक्ष होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...