आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Fund Of Jalgaon Municipal Corporation

निधी देऊनही महापालिका वेळेवर खर्च करीत नाही : पालकमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण तलावाच्या सुशाेभिकरणासाठी यापूर्वीही निधी देण्यात अाला हाेता. मात्र महापालिकेने ताे वेळेवर खर्च केला नाही. त्यामुळे पुढील निधी मिळण्यास अडचण निर्माण झाली हाेती. असे हाेऊ नये यासाठी यापुढे निधी वेळेत खर्च रून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करा, अशा शब्दात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी महापाैर नितीन लढ्ढा यांना कानपिचक्या दिल्या.

मेहरूण तलावावरील गणेश घाटाच्या कामाच्या कोनशिला अनावरण भूमिपूजन शनिवारी पालकमंत्री खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, महापालिका विरोधी पक्षनेते वामनराव खडके, आमदार सुरेश भोळे, गुरुमुख जगवानी, स्मिता वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. शहर विकासासाठी अनेक योजनांचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. अमृत योजना देखील त्यातीलच एक आहे. या याेजनेमुळे शहरवासीयांचा कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. विकासकामांवर नुसता खर्च करू नका तर, दिलेल्या अटी-शर्तीनुसार काम झाले पाहिजे, असे खडसे यांनी सांगितले.

मेहरूण तलावामध्ये परिसरातील घरे, कंपन्यांचे सांडपाणी सोडले जाते आहे. त्यामळे तलावात जल प्रदूषण होत आहे. यासाठी लवकरच विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासन महापालिकेला डिझेल उपलब्ध करून देणार आहे. त्या वेळी वाहनांचा वापर करून महापालिकेने तलावातील गाळ काढून घ्यावा. त्या दृष्टीने त्यांनी आतापासूनच नियोजन करण्यास सुरूवात करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

९८ लाखांचे काम
महापालिकेतर्फे मेहरूण तलावात गणेश घाटाच्या ९८ लाखांचे काम हाती घेण्यात आले आहे. तापीनंतर शहरवासीयांना गणेश विसर्जनासाठी तलावाचा एकमेव पर्याय आहे. गेल्या काळात अपघाताच्या घटना घडल्याने गणेश घाटाची मागणी होती. दोन महिन्यांत घाटाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

अल्पसंख्याकांसाठी आणखी कोटी देणार
अल्पसंख्याक, दलितेतर वस्ती विकासासाठी निधी दिला आहे. यातील कामे वेळेवर पूर्ण करा. त्यानंतर कामे वेळेवर पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करा. वेळेवर निधी खर्च झाल्यास अल्पसंख्याकांसाठी कोटी तसेच दलितवस्ती सुधार योजनेसाठी आणखी निधी देऊ, असे आश्वासन खडसे यांनी महापौरांना दिले. तसेच मेहरूण तलाव हे जळगावचे निसर्ग वैभव असून त्याच्या सुशोभिकरणाचे काम चांगले व्हावे, अशी अपेक्षा अाहे. यासाठी निधी कमी पडत असल्याने आणखी कोटी देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापुढे तक्रार येणार नाही
महापालिकेला सुशोभिकरणासाठी कोटींचा निधी वर्ग केला. मात्र, तो कमी पडत असल्याने काम झाले नाही. तुमच्या मार्गदर्शनातून तसेच सहकार्यातून मिळालेला निधी वेळेत खर्च करू, यापुढे आपल्याकडे निधी वेळेत खर्च झाल्याची तक्रार येणार नाही, असे आश्वासन महापौर नितीन लढ्ढा यांनी दिले.

गणेश घाटाच्या भूमिपूजनप्रसंगी संवाद साधताना महसूलमंत्री एकनाथ खडसे, सोबत महापौर नितीन लढ्ढा, आमदार गुरुमुख जगवाणी, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, उपमहापौर ललित कोल्हे.