आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीच्या आरोपींनी जळगाव कारागृह फुल्ल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांची संख्या वाढलेली आहे. तसेच गुन्हे उघडकीस येण्याची संख्येत वाढ झाल्याने अटक करण्यात येणार्‍या आरोपींची संख्याही मोठी आहे. त्यातच गेल्या कालावधीत झालेल्या जिल्हाभरातील दंगलींतील आरोपींची संख्या मोठी असल्याने सध्या क्षमतेपेक्षा अधिक आरोपींमुळे कारागृह फुल्ल झाले आहे.

कारागृहात सध्या एकूण 465 आरोपी असून, कारागृहातील 12 बॅरेक हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यात सर्वाधिक संख्या दंगलींच्या आरोपींची आहे. जिल्हा कारागृह वर्ग-2 मध्ये मोडले जाते. या कारागृहाची एकूण क्षमता 200 इतकी आहे; पण कारागृहात 465 आरोपी आहेत. त्यात विविध गुन्ह्यांच्या कलमांतील आरोपींची संख्या जास्त आहे. तसेच त्यात न्यायालयीन कोठडी मिळालेले 239 आरोपी आहेत.

दंगलींच्या गुन्ह्यातील 120 आरोपी
जळगाव कारागृहात सध्या सर्वाधिक संख्या दंगलींच्या गुन्ह्यातील आरोपींची आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दंगलींच्या गुन्ह्यातील 120 आरोपी कारागृहात आहेत. कायद्याच्या दृष्टीने दंगलीचा गुन्हा गंभीर मानला जातो. दंगलीच्या गुन्हय़ात अटक झालेल्या आरोपींना बर्‍याचदा जामीनदेखील लवकर मिळत नाही. त्यामुळे या गुन्हय़ातील आरोपींची संख्या दिवसागणिक वाढ जाते. त्यामुळे प्रशासनावर या आरोपींना सांभाळण्यासाठी मोठा ताण पडतो आहे.
‘लालपट्टी’चे सहा आरोपी

कारागृहातून, पोलिस कोठडीतून व पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या आरोपींना कारागृहाच्या प्रशासकीय भाषेत ‘लालपट्टीचे आरोपी’ असे संबोधले जाते. जळगाव कारागृहात लालपट्टीचे एकूण सहा आरोपी आहेत. हे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणांहून यापूर्वी पळून गेलेले आहेत.

खुनाचे 80 आरोपी
जिल्हय़ातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतर्गत झालेल्या खुनाच्या काही घटनांमधील आरोपीदेखील जिल्हा कारागृहात आहेत. खुनाचा गुन्हाही गंभीर असल्याने त्यात आरोपींना जामीन मिळण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ही संख्या वाढत जाते. सध्या खुनाच्या गुन्हय़ातील एकूण 80 आरोपी जळगाव कारागृहात आहेत.

कारागृह अधीक्षकांचा पत्रव्यवहार
कारागृहांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच जळगाव कारागृहाची स्थिती पाहिली तर येथील सुरक्षा धोक्यात असल्याचे जाणवते. तब्बल 200 आरोपी क्षमतेपेक्षा अधिक असल्याने त्यांना ठेवायचे कोठे? हा एक प्रo्नच आहे. कारागृहातील प्रत्येक बॅरेकमध्ये सध्या क्षमतेपेक्षा अधिक आरोपी आहेत. त्या तुलनेत कर्मचारी व अधिकार्‍यांची संख्या मात्र कमी आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. कारागृहात आरोपींची संख्या वाढली असल्याबाबत कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठांशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.

80 खुनाचे आरोपी
06 लालपट्टीचे आरोपी
22 महिला आरोपी
200 कारागृहाची एकूण क्षमता
465 सध्याच्या आरोपींची संख्या