आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jain Industries Wants To Adopt All Schools In Jalgaon

जैन उद्योग समुहाला सर्व शाळा दत्तक घेण्याची इच्छा - भवरलाल जैन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जग सोडण्याआधी माझ्या हातून चांगली पिढी तयार व्हावी अशी इच्छा आहे. त्यामुळे अनुभूती स्कूलप्रमाणे शहरातील इतर शाळाही दत्तक घेण्यास तयार आहे. मात्र, यासाठी पालिकेत एकमताने ठराव करायला हवा. एकानेही विरोध केला तर शाळा दत्तक घेणार नाही. जळगावचे देणे लागतो. त्यामुळे मला राजकारण नव्हे समाजकारण करायचे आहे, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष भवरलाल जैन यांनी केले.

शहरातील अनुभूती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी स्वागत कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. शाळेचा तिसरा वर्धापनदिनही साजरा झाला. या वेळी ज्येष्ठ कवी पद्मश्री ना.धों.महानोर, महापालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, शिक्षणाधिकारी शशिकांत हिगोणेकर, डॉ.नरेंद्र दोशी, अशोक जैन, अतुल जैन, निशा जैन, दलीचंद जैन उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या भाषणाने मंत्रमुग्ध
अनुभूती स्कूलमध्ये झोपडपट्टी व दारिद्र्यरेषेखालील पालकांचे मुले शिक्षण घेतात. मंगळवारी शाळेचा पहिला दिवस होता. विद्यार्थ्यांचे मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून झाशीच्या राणीचे धाडस, पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी राष्ट्राला उद्देशून केलेले पहिले भाषण असे विविध उपक्रम सादर केले.

ओपन स्पेसचाही विकास
महापालिका आयुक्त कापडणीस यांनी भवरलाल जैन यांना लहान मुलांना खेळण्यासाठी शहरातील सर्व ओपन स्पेस उद्यान म्हणून विकसित करण्याची विनंती केली. ते देखील जैन यांनी मान्य केली. मात्र, महापालिकेत एकमताने ठराव केला तर सर्व जागांचा विकास करण्याचे आश्वासन जैन यांनी दिले. या सर्व जागा केवळ विकसित करणार नाही, तर एक विभाग तयार करून त्याची देखभाल, संवर्धन करण्याचे काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पालकांनी व्यक्त केले मनोगत
इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे चांगल्या शाळेत पाल्यांना शिकवता येत नव्हते. मात्र, अनुभूती शाळेमुळे ते शक्य झाल्याचे मनोगत पालकांनी व्यक्त केले. शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांनी सांगितले की, 44 वर्षांपूवी मी याच शाळेत शिकलो. योगायोगाने त्याच शाळेत मला शिक्षणाधिकारी म्हणून येण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो - अनुभूती इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्या वेळी भवरलाल जैन, ना. धों. महानोर, आयुक्त संजय कापडणीस, शशिकांत हिंगोणेकर, डा. नरेंद्र दोशी आदी उपस्थित होते.