आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jain Irrigation Company,Latest News In Divya Marathi

कर्मचा-याच्या सतर्कतेने वाचली जैन इरिगेशन कंपनीची 40 लाखांची कॅश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बॅँकेत भरणा करण्यासाठी गेलेल्या जैन इरिगेशन कंपनीच्या दोन कर्मचा-यांच्या हातातून 40 लाख रुपये ठेवलेली पैशांची बॅग पळवून नेण्याचा प्रकार शनिवारी सकाळी 11.30 वाजता स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या दाणाबाजार शाखेत घडला. सुदैवाने बॅँक कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्याला लगेच पळ काढावा लागला. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये मात्र चोरटा कैद झाला. जैन इरिगेशनच्या अकाउंटमध्ये 40 लाख रुपये भरण्यासाठी दोन कर्मचारी बॅँकेत आले होते. तर संशयित मुलगाही 20 मिनिटांपासून त्याच्या आजूबाजूलाच वावरत होता. बॅँकेचे कर्मचारी दिलीप करमरकर यांच्या ताब्यात पैशांची बॅग देत असताना त्यांची नजर चुकवून त्या चोरट्याने बॅग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच करमरकर यांनी चोरट्याला हटकले. येणा-या संकटाची चाहूल ओळखत चोरट्याने तेथून पलायन केले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुणाच्याही हाती लागला नाही. या घटनेनंतर बॅँकेचे शाखा व्यवस्थापक अमिताभ झा यांनी शहर पोलिस ठाण्यात पत्र देऊन या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत बॅँकेतील सर्वच सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज पोलिसांना देण्याची प्रक्रिया सुरू होती.

ख्वाजामियॉँ परिसरातील गणगोपी अपार्टमेंटमधील तिस-या मजल्यावरील घरात भरदिवसा घरफोडी झाली. 21 तोळे सोने व 7 हजार असा ऐवज लुटून नेल्याची घटना दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान घडली. श्वानपथकाने जिन्यापर्यंतचा माग दाखवला. ब्लॉक नंबर 303 मध्ये राहत असलेले अनिल नामदेव भोळे यांच्या घरी चोरी झाली. भोळे हे एसटी महामंडळात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. घरातील गोदरेज कपाटाला लावलेल्या चावीने कपाट उघडून त्यातील 21 तोळे सोने व 7 हजार रुपये रोकड तसेच चिल्लर असलेला बटवाही चोरट्याने लांबवला. सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. भोळे हे ड्यूटीला गेले होते. त्यांच्या पत्नी व मुलगी या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घराला लावलेले कुलूप बनावट चावीने उघडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.