आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalasvarajya Implementing Phase Two Of The District's Element

जलस्वराज्य टप्पा दोन जिल्हाभरात राबवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जलस्वराज्य प्रकल्पाची पहिल्या टप्प्याची यशस्विता लक्षात घेता जागतिक बॅँकेशी झालेल्या करारानुसार राज्यात पुन्हा जलस्वराज्य टप्पा दोन हाती घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी नाशिक विभागात जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
राज्यात 2003 मध्ये पाच वर्षांकरिता जलस्वराज्य कार्यक्रम पंचायत राज संस्थांच्या अधिकार क्षेत्रांमध्ये लोकसहभागातून राबविण्यात आला होता. जागतिक बॅँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण भागात लोकसहभागातून पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. याच धर्तीवर आता जलस्वराज्य टप्पा दोन कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.
लोकसहभागातून योजना
राज्यातील सहा महसूल विभागांमधून प्रत्येकी दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यात नाशिक विभागातून जळगाव आणि नगर जिल्ह्याचा समावेश आहे. कार्यक्रम सुरू झाल्यापासून हा टप्पा सहा वर्षांचा राहणार आहे. यासाठी 235 दशलक्ष डॉलर ऐवढा खर्च अपेक्षित असून यापैकी 70 टक्के कर्ज व 30 टक्के शासन व लोकसहभाग असेल. यासाठी जागतिक बॅंकेकडून 1.25 टक्के व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठय़ाच्या योजना मार्गी लागतील.
जलस्वराज्य-2 कार्यक्रमासाठी जळगावची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी गेल्या वर्षी समितीने जिल्ह्यात झालेल्या कामांची पाहणी केली होती. यातून ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाच्या अनेक योजना पूर्ण होतील. मात्र, या कार्यक्रमासंदर्भातील पुढील सूचना अद्याप प्राप्त नाहीत. शीतल उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
686 पदांची आवश्यकता
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 169 पदे आणि क्षेत्रीय संस्थांच्या बळकटीकरणासाठी 517 पदे अशी 686 पदे जलस्वराज्य कार्यक्रमासाठी निर्माण करण्यात येणार आहे. ही स्थिती 12 जिल्ह्याची राहणार असून प्रत्येक जिल्ह्यात जलस्वराज्य कार्यक्रमाचा स्वतंत्र विभाग कार्यरत राहणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाबरोबरच ह्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना बळकटी मिळणार आहे.
असा आहे उद्देश
राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता सेवांचे नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण व शाश्वततेबाबत या क्षेत्रातील संस्थांच्या कामगिरीचा दर्जा उंचावणे, निमशहरी भागांमध्ये आणि पाणी गुणवत्ता बाधित व पाणीटंचाईच्या भागात गुणवत्तापूर्ण व शाश्वत पाणीपुरवठा सेवा पुरवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
70 योजना सुरळीत सुरू
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 100 गावांची निवड करण्यात आली होती. यात पाणीपुरवठय़ाच्या लोकसहभागातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या होत्या. यापैकी 70 हून अधिक गावांमध्ये या योजना सुरळीत सुरू आहेत. या योजनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. त्यातही काही योजना तांत्रिक अडचणींमुळे बंद पडल्या आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना पाठबळ मिळणार आहे.