जळगाव - चोपडा येथील व्यक्तीने पुण्याहून आणलेली ३८ लाख रूपयांची इम्पोर्टेड कारची नोंदणी करण्यास टाळाटाळ करून आठ महिने फिरवली. अखेर शनिवारी आरटीओ अधिकाऱ्यांनी ही कार जप्त केली असून तिच्यावर 6 लाखांपेक्षा जास्त नोंदणी फि, दंड व्याजाची फि थकीत असल्याचे तपासणीत आढळून आले.
चोपडा येथील भीमान ग्रुपच्या संचालकांनी ही कार आठ महिन्यांपूर्वी खरेदी केली आहे. सुरुवातीला एकदा आरटीओ विभागाच्या तपासणीत ही कार दोषी आढळली होती. त्यावर तात्पुरता दंड करून तसेच मालकाने दोन दिवसात नोंदणी करण्याचे आश्वासन देऊन कार परत मिळवली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी सातत्याने नोंदणीसाठी पाठपुरावा केला. तरी देखील कार मालकाने ही गाेष्ट गंभीरपणे घेतली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांचे फोन उचलणेदेखील त्यांनी बंद केले होते.
अखेर शनिवारी चाेपडा परिसरात ही कार रस्त्यावर फिरवत असल्याचे आढळून येताच आरटीओ अधिकाऱ्यांनी ती कार ताब्यात घेत जप्त केली. या वेळीदेखील कार मालकाने अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. या कारची किंमत ३८ लाख रूपये आहे. त्यानुसार १४ टक्के टॅक्स याप्रमाणे लाख रूपये नाेंदणी फी थकीत आहे. तर १० महिन्यांचे व्याज दंड असा जवळपास लाख रूपयांचा दंड गाडी मालकाला भरावा लागेल.