आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांत दारूचे दुकान बंद करा, अन्यथा तोडफोड करू; जळगावमधील संतप्त महिलांनी दिला इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील देशी दारूच्या दुकानामुळे अनेक ग्रामस्थांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलेही दारूच्या व्यसनाला लागली आहेत. अनेक कुटुंबे व्यसनामुळे देशोधडीला लागले आहेत. गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव करूनही उत्पादन शुल्क विभागाने दुकान बंद करण्याची कारवाई केलेली नाही.
 
येत्या दोन दिवसात हे दारू दुकान पूर्णपणे बंद झाल्यास त्याची तोडफोड करण्यात येईल, असा इशारा नांद्रा येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करत दोन दिवसात हे दुकान बंद करण्याचे आश्वासन महिलांना दिले. 
 
नांद्रा बुद्रुक येथील महिलांसह ग्रामस्थांनी मंगळवारी दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हाेता. यामध्ये बहुसंख्य महिलांचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी दारूबंदीच्या घोषणा दिल्या. या वेळी त्यांच्या दालनातील बैठक साेडून जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर नांद्रा येथील ग्रामस्थांचे निवेदन घेण्यासाठी बाहेर आले. या वेळी महिलांनी त्यांची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. अनेक वर्षांपासून गावात दारूचे दुकान आहे. ते यापूर्वी बंद करण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. या दुकानामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलेही व्यसनाधीन झालेली आहेत. दारूच्या नशेत महिलांना मारहाण करण्यात येत असल्याने सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. 
 
नांद्रा बु.येथीलमद्य विक्रीचे दुकान बंद करण्याबाबतचा ग्रामसभेचा ग्रामसेवकाने पाठवलेला अहवाल मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. आम्ही तहसीलदारांना २०११ च्या जनगणनेनुसार महिला मतदारांची फोटोसह मतदार यादी दिलेली आहे. मतदानाबाबत पडताळणी करणार आहोत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी दारूबंदीबाबत निर्णय घेतील. 
- नरेंद्र दहिवडे, निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग 
 
अात्मदहनाचा दिला इशारा 
दोन दिवसांमध्ये निर्णय झाल्यास दारूच्या दुकानाची तोडफोड करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा प्रतिभा सपकाळे, दुर्गाबाई सोनवणे, सुभद्रा सोनवणे, शोभाबाई चौधरी, ज्योती खैरे, बेबीबाई सोनवणे, कमल सोनवणे, सरला सपकाळे, उज्वला सोनवणे, सरुबाई सोनवणे, कौशल्या सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर हे गावात जावून प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर दोन दिवसात या दारूच्या दुकानाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन महिलांना देण्यात अाले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...