आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: महापौरपदासाठी होणार चुरस; मनसेला संधी मिळाल्यास सिंधू कोल्हे दावेदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला तरी मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमत दिलेले नाही. पहिल्याच पंचवार्षिकला अटीतटीची स्थिती उद्भवल्याने अपक्ष उमेदवारास महापौर पदाची संधी देऊन सत्ता राखण्याची वेळ खाविआवर आली होती. यावेळी देखील महापौर पदाच्या अटीवरच सत्ता स्थापनेची गणिते जोडली जात असल्याने पदासाठी चुरस वाढणार आहे.

21 सप्टेंबर 2003 रोजी पालिका स्थापन झाली होती. पहिल्याच निवडणुकीनंतर 31 सप्टेंबर रोजी महापौर निवड झाली. पहिल्यांदा बहुमताच्या जवळ जाऊनही सत्ता स्थापन करणे शक्य नसल्याने महापौर पदाची किंमत मोजून खान्देश विकास आघाडीने सत्ता राखली होती. यावेळी पालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला राखीव आहे.

खान्देश विकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले असते तर ज्येष्ठ नगरसेविका पुष्पा पाटील या पदाच्या दावेदार मानल्या जात होत्या. मात्र पूर्ण बहुमतही नाही आणि त्याही निवडून आलेल्या नाहीत. सर्वाधिक जागा निवडून आलेल्या खान्देश विकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेणारा पक्ष कोणत्या अटीवर जोडला जातो त्यावर महापौर पदाचा उमेदवार ठरणार आहे.

आतापर्यंतचे महापौर
आशा कोल्हे
तनुजा तडवी
रमेश जैन
प्रदीप रायसोनी
अशोक सपकाळे
सदाशिव ढेकळे
विष्णू भंगाळे
जयश्री धांडे
किशोर पाटील

गणिते बदलल्यास बदलतील नावे

खान्देश विकास आघाडीतर्फे महापौर पद स्वत:कडे ठेवून एखाद्या पक्षाचे किंवा आघाडीचे सहकार्य घेण्याचे ठरवले तर भारती सोनवणे, राखी सोनवणे, ज्योती इंगळे किंवा जयश्री महाजन यांच्यापैकी एक नाव पुढे येऊ शकते.

महापौरपद मिळण्याच्या अटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येण्याची संधी मिळाल्यास त्यांच्यातर्फे सिंधू कोल्हे महापौर पदाच्या दावेदार असतील.

महापौरपदाच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येण्याची संधी चालून आल्यास अश्विनी देशमुख, प्रतिभा कापसे, शालिनी काळे यांच्यापैकी एक नाव पुढे येऊ शकते.

महापौर पदाच्या अटीवर सत्तेत येण्याची संधी उपलब्ध झाल्यास भाजपतर्फे उज्ज्वला बेंडाळे, जयश्री पाटील, अँड. सुचिता हाडा यांच्यापैकी एक नाव पुढे येऊ शकते.

मनपात महिला 50 नव्हे तर 52 टक्के
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्यानंतर जळगाव महापालिकेत प्रथमच 50 टक्के जागांवर महिलांनी उमेदवारी केली. काही विना आरक्षित प्रभागातूनही महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. 50 टक्क्यांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र जळगाव महापालिकेत महिलांची ताकद 52 टक्के असणार आहे. एकूण 75 नगरसेवकांपैकी 39 महिला आहेत. महापौरपदही महिलांसाठी राखीव असल्याने सभागृहात महिलांचा आवाज राहणार आहे. महापालिकेच्या सभागृहात आतापर्यंत पुरुषांचे वर्चस्व असल्याने महिलांना एका कोपर्‍यात बसून कामकाजात सहभाग घ्यावा लागत होता. 50 टक्के जागा राखीव असल्याने या निवडणुकीत पुरुषांची अडचण झाली होती. निवडणूक झाल्यानंतर महिलांची संख्या निम्म्यापेक्षाही अधिक वाढली आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 39 महिला तर 36 पुरुष आहेत.

पुरुषांच्या घुसखोरीचे आव्हान: महिला राखीव जागांमुळे उमेदवारी करण्याची संधी हुकलेल्या काही नगरसेवकांनी पत्नी अथवा घरातील महिलेलाच उमेदवारी दिल्याने पद घरातच आले आहे. पदावर महिला असली तरी प्रत्यक्षात स्वत: त्या पदाचा वापर करण्यासाठी पालिकेत आणि सभागृहापर्यंत हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर संख्येने महिला अधिक असूनही प्रत्यक्षात पुरुषांची घुसखोरी मोठे आव्हान ठरणार आहे.

मनसेच्या 11 जागांमुळे प्रमुख पक्षांच्या या जागांना फटका बसला
04 खाविआ
05 भाजप
01 राष्ट्रवादी
01 अपक्ष

पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी
खाविआ 34
भाजप 21
राष्ट्रवादी 17
अपक्ष 04
सपा 02
कॉग्रेस 02
मनसे 13