आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांचे अटकपूर्व जामीन फेटाळले, उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दिली मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील ४४० बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सातपैकी सहा डॉक्टरांचे अटकपूर्व जामीन न्यायाधीश एम.क्यू.एस.एम.शेख यांनी गुरुवारी फेटाळले. त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशूवाॅर्डात गेल्यावर्षी प्रचंड प्रमाणात बालकांचे मृत्यू झाले. यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकाराने हे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर यांच्यासह सात डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी गुप्ता यांनीच न्यायालयात याचिका दाखल केली होती. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. त्यावर सुनावणी होऊन गुरुवारी डॉ.लाळीकर यांच्यासह डॉ.स्मिता मुंढे, डॉ.मंदार काळे, डॉ.हिरा दामले, डॉ.अभय जोशी आणि डॉ.उमेश वानखेडे यांचे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आले. सरकारपक्षातर्फे अॅड.सुरेंद्र काबरा यांनी, फिर्यादी गुप्ता यांच्यातर्फे अॅड.गिरीश नागोरी यांनी तर त्रयस्थ अर्जदारांतर्फे अॅड.विजय दाणेज यांनी काम पाहिले. सुनावणी वेळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, या गुन्ह्याचे तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक गिरधर निकम हे पोलिसांच्या फौजफाट्यासह न्यायालयात हजर होते. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर डॉक्टरांना अटक करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते, म्हणून पोलिसांनी तयारी करून ठेवली होती.

इंगळेचा अर्ज नाही
गुन्ह्यातीलसातवे संशयित आरोपी डॉ.युधिष्ठिर इंगळे गुरूवारी गैरहजर हाेते. त्यांनी अद्याप अटकपूर्व जामीन अर्जही दाखल केलेला नाही. इतर डॉक्टरांना अटक झाल्यास त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
फोटो - काेर्टातून बाहेर पडताना लाळीकर.