आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव विमानतळावर टळली मोठी दुर्घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव विमानतळावर धावपट्टीवर उतरत असताना अहमदाबाद येथून आलेल्या एका खासगी विमानाचे एक टायर पंक्चर झाले. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत ते कौशल्याने नियंत्रणात आणल्याने मोठा अपघात टळला. या विमानातून गुजरातमधील अनिल स्टार्च प्रॉडक्ट कंपनीचे मालक अमोलभाई सेठ आणि त्यांचे दोन संचालक प्रवास करीत होते.
‘इनव्हीजन एअर कंपनी’चे व्हीआयटीएजी प्रकारातले हे आठ आसनी चार्टर्ड विमान विमानतळावर शुक्रवारी उतरले. ते धावपट्टीवर असतानाच डाव्या बाजूला झुकले. विमानाचे डावे चाक पंक्चर झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले.
प्रसंगावधान राखत त्याने तातडीने वेग कमी करत विमान थांबवले. उतरण्याआधीच टायर पंक्चर झाले असते तर विमान एका बाजूला फेकले गेले असते आणि मोठी दुर्घटना घडली असती. येथील व्यापारी घनश्यामदास अग्रवाल यांनी सेठ यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने समन्स बजावल्याने ते न्यायालयात हजर होण्यासाठी शहरात आले होते. त्यानंतर दुसर्‍या एका विमानाने सेठ संचालकांसह अहमदाबादकडे रवाना झाले.
कमालीची गुप्तता
या विमानाने नेमके कोण जळगावला आले होते, याविषयी गुप्तता पाळली गेली. सेठ यांच्या सेवेत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवस्थापनापासून संबंधित सर्व यंत्रणांकडून त्यांच्या आगमानाबाबत अत्यंत काटेकोरपणे गुप्तता पाळली जात होती. मात्र, ‘दिव्य भास्कर’च्या अहमदाबाद कार्यालयातून संबंधित कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधण्यात आला. त्या वेळी अमोलभाई सेठ आणि त्यांचे संचालकच या विमानाने जळगावला गेले होते आणि ते सायंकाळी अहमदाबादला पोहोचले, असे संबंधित संचालकांकडून सांगण्यात आले.