आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव विमानतळावर टळली मोठी दुर्घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव विमानतळावर धावपट्टीवर उतरत असताना अहमदाबाद येथून आलेल्या एका खासगी विमानाचे एक टायर पंक्चर झाले. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत ते कौशल्याने नियंत्रणात आणल्याने मोठा अपघात टळला. या विमानातून गुजरातमधील अनिल स्टार्च प्रॉडक्ट कंपनीचे मालक अमोलभाई सेठ आणि त्यांचे दोन संचालक प्रवास करीत होते.

‘इनव्हीजन एअर कंपनी’चे व्हीआयटीएजी प्रकारातले हे आठ आसनी चार्टर्ड विमान शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर उतरले. ते धावपट्टीवर असतानाच अचानक डाव्या एका बाजूला झुकले. विमानाचे डावे चाक पंक्चर झाले आहे, हे वैमानिकाच्या लक्षात आले.

प्रसंगावधान राखत त्याने तातडीने वेग कमी करत विमान थांबवले. टायर कशामुळे पंक्चर झाले हे लक्षात आले नसले तरी धावपट्टीवर टेकल्यावरच ते पंक्चर झाले असण्याची शक्यता आहे. उतरण्याआधीच जर ते पंक्चर असते तर विमान एका बाजूला फेकले गेले असते आणि मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी माहिती वैमानिकाने दिली. जळगावातील व्यापारी घनश्यामदास अग्रवाल यांनी दाखल केलेल्या बनावट दस्तऐवज प्रकरणात ‘अनिल स्टार्च’चे मालक अमोल एस. सेठ आणि त्यांच्या संचालकांना जळगाव न्यायालयाने समन्स बजावल्याने ते आज न्यायालयात हजर झाले. त्यांचे दोन संचालक अनिस कस्तुरभाई शाह आणि कमलभाई सेठ हेही त्यांच्यासमवेत होते. सायंकाळी याच कंपनीचे दुसरे एक विमान जळगावला आले. त्या विमानाने अभियंताही आले असून जातांना ते विमान अमोल सेठ आणि त्यांच्या संचालकांना परत अहमदाबादला घेऊन गेले. विमानानेच ते अहमदाबादला पोहोचल्याची माहिती कंपनीच्याच एका संचालकाने रात्री अहमदाबाद येथून दिली.

कमालीची गुप्तता पाळली
या विमानाने नेमके कोण जळगावला आले होते, याविषयी प्रचंड गुप्तता पाळली गेली. विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांपासून ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या व्यवस्थापनापर्यंत आणि त्यांच्या सेवेत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवस्थापनापासून संबंधित सर्व यंत्रणांकडून अत्यंत काटेकोरपणे ही गुप्तता अखेरपर्यंत पाळली जात होती. मात्र, ‘दिव्य भास्कर’च्या अहमदाबाद कार्यालयातून संबंधित कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधण्यात आला. त्या वेळी अमोलभाई सेठ आणि त्यांचे संचालकच या विमानाने जळगावला गेले होते आणि ते सायंकाळी अहमदाबादला पोहोचले, असे संबंधित संचालकांकडून सांगण्यात आले.