आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जळगावातून विमान उड्डाणाची प्रतीक्षा अजून लांबली आहे. सिल्व्हर ज्युबिली कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाकडून तयारी पूर्ण झाली असली तरी तांत्रिक परवानगी मिळणे बाकी असल्याने उड्डाण महिनाभर लांबणीवर पडले आहे. दरम्यान, कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात जळगावातून मुंबई आणि पुण्यासाठी सर्वाधिक प्रवासी. इतर ठिकाणांसाठी मागणी असली तरी प्रत्यक्षात प्रवासी कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
सोलापूर येथून विमान सुरू करण्याच्या हालचाली मंदावल्यामुळे सिल्व्हर ज्युबिली कंपनीकडून जळगावातून विमानसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. डिसेंबरपर्यंतचा वेळ गृहीत धरून जानेवारीत सेवा सुरू करण्यासाठी कंपनीने वेळ निश्चित केली होती. मात्र, नागरी उड्डाण विभागाकडून सिल्व्हर ज्युबिलीला उड्डाणाबाबत परवानगी मिळालेली नाही. तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी दिल्लीत केलेल्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. अडचण लक्षात घेऊन कंपनीला सेवा सुरू करण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे व्यवस्थापक मुकेश रमाणी यांनी सांगितले.
ऑपरेशन टीमचे काम सुरू
जळगावातून विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविल्यानंतर कंपनीच्या ऑपरेशन टीमकडून इतर ठिकाणच्या विमानतळांची माहिती, वेळापत्रक आणि इतर तांत्रिक माहितीवर काम सुरू केले आहे. आमची तयारी पूर्ण झाली असून कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली नसल्याचे विमानतळ व्यवस्थापक के.सी.शर्मा यांनी सांगितले.
प्रवासी उपलब्धतेसाठी सर्वेक्षण
कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात जळगावातून सर्वाधिक प्रवासी मुंबई आणि पुणे येथे जाणारे आहेत. या तुलनेत इतर ठिकाणी मागणी होत असली तरी प्रवासी संख्या कमीच आहे. विमानसेवा नियमित सुरू राहण्यासाठी दररोज प्रवासी मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच नियमित सेवा सुरू राहील. त्या दृष्टीने कंपनीकडून इतर ठिकाणांसाठी किती प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल याबाबत माहिती घेतली जात आहे. रेल्वे आणि ट्रॅव्हल कंपन्यांशी संपर्क साधून कंपनीच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली आहे. केवळ दोन शहरांसाठी सेवा परवडणारी नसल्याने इतर ठिकाणांचा देखील विचार करावा लागणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
तांत्रिक अडचण
विमानतळ प्राधिकरण, कंपनीकडून तयारी पूर्ण; सर्वेक्षणात मुंबई, पुण्यासाठी सर्वाधिक प्रवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.