आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात टपाल कार्यालयाची सप्टेंबरपासून कोअर बँकिंग सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पोस्ट कार्यालये आता काळानुरूप अपडेट होत असून, विविध ग्राहकाभिमुख सुविधाही देऊ लागली आहेत. त्यानुसार येथील मुख्य पोस्ट कार्यालयात आता येत्या सप्टेंबरपासून कोअर बॅँकिंग व एटीएम सेवा सुरू होणार आहे. यासह पुढील पाच वर्षांत पोस्टाचे संपूर्ण रूप बदलण्यासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.

इन्फोसिस कंपनी, टाटा कन्सल्टन्सी व रिलायन्स कंपनीच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट सुरू होत आहे. जिल्हय़ातील सर्व खेडी पोस्टाच्या माध्यमातून जोडली जाऊन नागरिकांना या सुविधांचा लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्य डाक अधीक्षक एस.एम.पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

फायनान्स अँण्ड अकाउंटिंग: या सेवेत नागरिकांना पोस्टात सर्व प्रकारची आर्थिक गुंतवणूक व त्यासंबंधीचे अपडेट घेता येणार आहे.
हेल्प डिस्क: यात विशिष्ट नंबरवरून विविध योजना, कर्ज, गुंतवणूक याविषयीची माहिती ग्राहकांना मिळेल.
एटीएम: देशभरातील सर्व पोस्टांमध्ये एटीएम सुरू करण्यात येणार असून, तालुकास्तरावरील पोस्टातील एटीएममधून ग्राहकांना पैसे काढता येणार आहेत.
एचआर: यानुसार मानव संसाधन विभागांतर्गत सर्व पोस्ट कार्यालयांत सुसंवाद व्हावा म्हणून सर्व कार्यालये एकसंध होणार आहेत.

ग्राहकांना मिळणार या सुविधा
कोअर बॅँकिंग : या सुविधेमुळे ग्राहकांना देशभरातील कोणत्याही पोस्ट खात्यातून आपल्या पैशांची देवाणघेवाण व पत्रव्यवहार करता येणार आहे.
मेल ऑपरेशन : या सुविधेमुळे ग्राहकाने केलेले स्पीडपोस्ट सध्या कुठे आहे, याविषयीचे अपडेट इंटरनेटद्वारे घेता येणार आहे.
रूरल अँप्लिकेशन: खेड्यापाड्यांतील पोस्ट कार्यालये संगणकीकृत करून नागरिकांना सर्व सबसिडींचा लाभ पोस्ट खात्यातून मिळवता येणार आहे.

जिल्ह्यातील पोस्टाची सद्य:स्थिती
टपाल शाखेची एकूण 494 कार्यालये जिल्ह्यात आहेत.
39 जळगाव विभागातील एकूण सबपोस्ट कार्यालये
251 पोस्ट शाखा कार्यालये
35 चाळीसगाव विभागातील एकूण सबपोस्ट कार्यालये
243 पोस्ट शाखा कार्यालय.

एटीएम सप्टेंबरपासून
केंद्र शासनाने डाक खात्याच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांना त्यांचा फायदा व्हावा म्हणून पाच हजार कोटी रुपये खर्चाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. सूचना व प्रसारणमंत्री कपिल सिब्बल यांनी याकामी पुढाकार घेऊन या पायलट प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून, देशभरातील सर्व विभागस्तरावर याचे काम सुरू आहे. कोअर बॅँकिंगची सुविधा सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होणार असून, जळगाव व चाळीसगाव विभागातील एकूण 15 तालुक्यांमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. तसेच एटीएमसाठी सर्व पोस्ट कार्यालयांत जागाही निश्चित करण्यात आली आहे. एटीएम सुविधेमुळे सुरुवातीला देशभरातील पोस्ट कार्यालये एकसंध होतील. त्यानंतर पुढील दोन वर्षांत सर्व राष्ट्रीयीकृत बॅँका या सुविधेशी जोडल्या जाणार आहेत.