आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलन तुटवड्यामुळे शहरात निम्म्या एटीएममध्ये पैशांचा खडखडाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चलन तुटवड्यामुळे शहरातील निम्म्यापेक्षा अधिक एटीएममध्ये खडखडाट झाला अाहे. पैसे नसल्याने अनेक एटीएम केंद्रांचे शटरच खाली ओढून ते बंद करण्यात आले आहेत. जे एटीएम सुरू आहेत, त्यामध्ये अनेक ठिकाणी कार्ड स्वाइप केल्यानंतर नो कॅशचा संदेश ग्राहकांना मिळत आहे. एटीएममध्ये अचानक रोकडचे प्रमाण का आटले याविषयी बँक अधिकारीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, कॅशलेस व्यवहारांना अधिक चालना देण्यासाठी चलन तुटवडा केला जात असावा, असा दावा काही बँक अधिकाऱ्यांनी केला.
 
एक हजार पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर निर्माण झालेला चलन तुटवडा अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील बॅँकांना पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नाही. त्यामुळे बँकांसमोर आर्थिक पेच निर्माण झालेला आहे. उपलब्ध पैशांमधून बँकांचे कामकाज चालवले जात आहे. एटीएममध्ये टाकण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने सोमवारपासून एटीएम सेवा विस्कळीत झाली आहे. नागरिक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातात. कार्ड स्वाइप केल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘नो कॅश’ असा संदेश स्क्रीनवर झळकत आहे. हिरमोड होऊन नागरिक दुसऱ्या एटीएम केंद्राचा शोध घेत आहेत. शहरात राष्ट्रीयकृ़त, खासगी बँकांचे ५० पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक एटीएम केंद्र बंद आहेत. बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्यापेक्षा एटीएमद्वारे पैसे काढण्याकडे नागरिकांचा कल आहे. मात्र, ही सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी बॅंकांचा आधार घ्यावा लागत आहे. काही बँकांच्या एटीएममध्ये त्याच बँकेचे एटीएम स्वीकारण्यात येत होते. इतर बँकेचे एटीएम असल्यास पैसे काढता येत नव्हते.
 
स्टेटबँकेसह निवडक एटीएमचा आधार: शहरातील स्टेडियम चौक परिसरातील स्टेट बंॅक ऑफ इंडियाचे एटीएम सुरू असल्याने नागरिकांना त्याचा आधार झाला. याशिवाय स्वातंत्र्य चौकातील आयडीबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम केंद्र सुरू होते. मात्र, केवळ दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत होत्या. नेहरू चौकातीलही आयडीबीआय बँकेचे एटीएम केंद्र सुरू होते. तेथे नागरिकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. काव्यरत्नावली चौकातील जळगाव जनता बँकेची एटीएम सेवा सुरू होती. दादावाडी रिक्षा स्टॉपजवळील कोटक महिंद्रा बँक अॅक्सिस बँकेचे एटीएम सुरू होते.
 
सेवा विस्कळीत असल्याने शटर डाऊन
रामानंदनगर परिसरातील एचडीएफसी बँक अॅक्सिस बँकेचे एटीएम केंद्रे तर सुरू होती. मात्र, त्यामध्ये पैशांचा खडखडाट होता. काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँक,अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक,स्वातंत्र्य चौकातील येस बँकेच्या एटीएमची सेवा विस्कळीत झाल्याने शटर डाऊन करण्यात आले होते. कोर्ट चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून नो कॅशचा मेसेज येत होता. नवीपेठेतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचेही शटर डाऊन करण्यात आले होते. पंजाब नॅशनल बँकेचेही एटीएममधून पैस निघत नव्हते.
 
बातम्या आणखी आहेत...