आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील १५ किलोमीटर महामार्गाचे काँक्रिटीकरण, चौपदरीकरणास मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; जळगाव-औरंगाबाद राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करून हा मार्ग चौपदरीकरणास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी एकूण १५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जळगाव शहरातून जाणाऱ्या सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाचीही चौपदरीकरणाच्या धर्तीवर दुरुस्ती करण्यात येईल.
शहराच्या हद्दीतील १५ किलोमीटरच्या रस्त्याचेही काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांबाबत मी स्वत: येत्या आठवड्यात हा प्रस्ताव दिल्ली येथे घेऊन जाणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील विविध रस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. यापूर्वीच औरंगाबाद ते फर्दापूरपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणास केंद्राने मंजुरी दिलेली आहे. हा रस्ता पुढे जळगावपर्यंत जोडण्यास मंजुरी देत केंद्राने ५५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. औरंगाबाद ते जळगाव रस्त्यासाठी आता एकूण १५५० कोटी रुपये निधी उपलब्ध होईल. हा राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग ४२ म्हणून ओळखला जाईल. त्यात जळगाव ते वाकोद (फर्दापूर) या ५५ किमीसाठी ५५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. औरंगाबाद-येवला-नाशिक या रस्त्याचेही चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यासह जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी होणार आहे.

जळगाव शहरातील महामार्ग होणार दुरुस्त
जळगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरून वळवण्यात येणार आहे. दरम्यान, सध्याचा शहरातील रस्ताही खराब झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली असून नितीन गडकरी यांनी तातडीने हा प्रस्ताव मागवला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत स्वत: प्रस्ताव घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. तरसोद ते पाळधीदरम्यानचा शहरातून जाणारा १५ किमीचा महामार्ग संपूर्ण काँक्रिटीकरण केले जाईल. त्याला प्रत्येक किलोमीटरसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या रस्त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या संपूर्ण जागेचा उपयोग केला जाईल. त्यामुळे हा रस्ताही चौपदरीकरणाच्या धर्तीवरच असेल, अशी माहिती खडसे यांनी दिली.

या रस्त्यांनाही निधी
केंद्राकडून शुक्रवारी जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरणासह विविध रस्त्यांना निधी मंजूर करण्यात आला. त्यात रावेर, पिंप्रीनांदू, नायगाव ते भोळफाटा या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी, सावदा-हतनूर, मानपूर, चांगदेव या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपये, कर्की, कोठा, बेलसवाडी, अंतुर्ली फाटा या रस्त्यासाठी सहा कोटी रुपये आणि कळमोदा, न्हावी, हिंगोणा या रस्त्यासाठी पाच कोटी, अशा २२ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे.