आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिक्षाचालकांच्या बंदमुळे प्रवासी वेठीस, इलेक्ट्रिक मीटरसाठी शासनाने दिली होती संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आरटीओ कार्यालयाकडून इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे; मात्र या कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी शहरातील काही रिक्षा संघटनांनी बंद पाळला. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागली. तसेच पर्यायी व्यवस्था असलेल्या सिटी बसेसमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे अनेकांनी लटकून प्रवास केला. रिक्षाचालकांच्या या मुजोरीमुळे प्रवासी मात्र नाहक वेठीस धरले गेले.

इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असून, या आदेशाला एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे. शासनाने आधी स्वयंस्फूर्तीने इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची संधी दिली होती; मात्र रिक्षाचालकांनी उदासीनता दाखवली. त्यामुळे आता शासनाने कडक पाऊल उचलत कारवाईचा बडगा उगारला आहे; मात्र रिक्षाचालकांकडून त्यास पुन्हा विरोध केला जात आहे. त्यासाठी रिक्षाचालकांनी प्रवाशांना वेठीस धरण्याचा मार्ग अवलंबला असून, ‘रिक्षा बंद’चा पर्याय स्वीकारला आहे. असे असले तरी, शहरातील काही रिक्षा संघटना व विद्यार्थी वाहतूक करणार्‍या संघटनांनी बंद पाळला नाही. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

काही संघटना बंदच्या विरोधात
रेल्वेस्थानकावरील भारतर} डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन, स्वतंत्र ऑटोरिक्षा युनियन, मनसे वाहतूक संघटनेसह आकाशवाणी, सिंधी कॉलनी, आठवडे बाजार आदी ठिकाणच्या रिक्षाचालकांनी बंद पाळला. जोपर्यंत आरटीओ विभाग कारवाई थांबवत नाही तोपर्यंत बेमुदत रिक्षा बंद सुरूच राहील, अशी माहिती डॉ.आंबेडकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष शांताराम आहिरे यांनी दिली. दरम्यान, वीर सावरकर रिक्षा युनियन या संपात सहभागी नव्हती. रिक्षाचालकांना येणार्‍या अडचणींसंदर्भात आरटीओ विभागाशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही या संपात सहभागी नव्हतो, असे वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

इतर रिक्षाचालकांना धमक्या
रेल्वेस्थानकावरील रिक्षा संघटनांनी कडकडीत बंद पाळला; मात्र ज्या रिक्षाचालकांनी शहरातील इतर भागातून प्रवाशांना रेल्वेस्थानकावर आणले अशा रिक्षाचालकांना या रिक्षाचालकांकडून धमक्या देण्याचा प्रकार झाला. एका पॅजो रिक्षाचालकाने स्थानकावर प्रवासी आणल्यानंतर नशेत असलेल्या संपकरी रिक्षाचालकांनी त्याच्यासह प्रवाशांशी हुज्जत घातली. अखेर प्रवासी महिलेने हात जोडून माफी मागितल्यानंतर रिक्षाचालकांचा वाद मिटला. या प्रकाराने संपकरी रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे रिक्षाचालकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. तसेच मीटर बसवल्यानंतरच्या टप्प्यात मीटरप्रमाणे भाडे आकारण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करणार आहोत.
सुभाष वारे, उपविभागीय परिवहन अधिकारी

मुदत वाढवून द्या
रिक्षा बंदमुळे नागरिकांचे हाल झाले. सध्या रमजान महिना सुरू असून, काही दिवसांनी र्शावण महिना सुरू होईल. त्यामुळे सणासुदीच्या काळात रिक्षा बंद ठेवणे योग्य नाही. तसेच प्रशासनाने मीटर बसवण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी व राजकीय नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून तोडगा काढावा, असे मुस्लिम समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जहॉँगीर खान, ऐनोद्दीन शेख, अब्दुल मजीद शेख यांनी पत्रकाद्वारे कळवले.

वृद्धांसह रुग्णांचे झाले हाल
बंद पाळणार्‍या रिक्षा संघटनांनी विद्यार्थी, वृद्ध व रुग्ण प्रवाशांचीही वाहतूक केली नाही. त्यामुळे जिल्हा व खासगी रुग्णालयांतील अनेक रुग्णांना पायपीट करावी लागली. तसेच परदेशातून आलेल्या पाहुण्या पर्यटकांनाही पायपीट करावी लागली. एकंदरीत, रिक्षा संघटनांच्या या धोरणामुळे प्रवाशांचे पुरते हाल झाले.