आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्मचारी भरती अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव जिल्हा सहकारी बॅँकेतील 160 जागांसाठी झालेली कर्मचारी भरती अडचणीत आली आहे. भरतीसाठी असलेली सहा महिन्यांची मुदत संपल्याने शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा बॅँकेच्या सभेत घेण्यात आला. तसेच मुदतवाढ मिळेपर्यंत भरतीप्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णय झाला.

जिल्हा बॅँकेतील 160 जागांच्या कर्मचारी भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने सहा महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे आता प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. त्यासाठी सहकारमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवावा लागणार असून, त्यांनी या भरतीला मंजुरी दिली तरच प्रक्रिया राबवता येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या बैठकीत कर्मचारी भरतीच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली.

संचालक डॉ.सतीश पाटील यांनी भरतीप्रक्रियेला आक्षेप घेतला. तसेच शासनाकडून मुदतवाढ मिळाल्याशिवाय प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका घाऊन प्रक्रिया राबवल्यास त्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी एमकेसीएलतर्फे आलेली ‘कटऑफ लिस्ट’ या बैठकीत सादर करण्यात आली. त्यात एकास तीन याप्रमाणे नव्हे, तर एकास पाच याप्रमाणे यादी दिल्यास जास्त उमेदवारांना संधी मिळू शकेल, अशी मागणी संचालकांनी केली.

सत्ताधारी-विरोध एकत्र कसे
औरंगाबाद खंडपीठाने भरतीसंदर्भात जिल्हा बॅँकेला नोटीस बाजावली आहे. तसेच चेअरमनच्या विरोधात न्यायालयात गेलेले विरोधक आताच कसे एकत्र आले. भरतीत पैशांचा बाजार राहणार असल्याने तेरी भी चुप मेरी भी चुप ची भुमीका घेतली जात आहे. चेअरमनची मुदत संपल्याने त्यांना भरतीचा अधिकार नाही, असा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पवार यांनी केला आहे.

मुदतवाढ गरजेची
जिल्हा बॅँकेतील कर्मचारी भरतीसाठी शासनाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांकडे मुदतवाढीचा प्रस्ताव देणे गरजेचे आहे. बुधवारची बैठकही तहकूब झाली असती, तर संचालक मंडळासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कळवावे लागले असते. - संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक