आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीएचआर’ पतसंस्थेतील ग्राहकांच्या ठेवींचा केला स्वार्थासाठी वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे संचालक प्रमोद रायसोनी यांनी ठेवीदारांचे पैसे अनेक उद्योगांमध्ये बेकायदेशीरपणे वापरले आहेत. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दाखल दोषारोपपत्रात रायसोनींसह त्यांच्या व्यवसायात भागीदारी असलेल्या काही बड्या उद्योजकांचे जबाब नोंदवलेले आहेत. त्यानुसार रायसोनी यांनी उद्योजकांना बेकायदेशीरपणे नियमबाह्य व कुठलेही तारण न ठेवता कर्ज दिले आहे. शिवाय या उद्योगांमध्ये रायसोनी हे स्वत: भागीदारही झालेले आहेत.
बळीरामपेठेतील आर. बी. डायमंड या फर्ममध्ये रायसोनी यांचा पूर्ण पैसा असून ४०/ ५० टक्के या प्रमाणात भागीदारी असल्याचे बागरेचा यांनी कबूल केले आहे. २००६ मध्ये सुरू झालेल्या या दालनाचे सर्व व्यावसायिक व भागीदारीची कागदपत्रे रायसोनी यांच्याकडे आहेत. दालनाची जागा भागीदार म्हणून दोघांच्या मालकीची आहे. रायसोनी - बागरेचा या नावाच्या फर्मचे जळगाव येथील फेडरल बँकेत चालू खाते आहे. आर. बी. डायमंडसाठी लागणारा पैसा रायसोनी यांनी मागितल्याप्रमाणे वेळोवेळी उपलब्ध करून दिल्याचे बागरेचा यांनी पाेलिसांना सांगितले.
पुण्यातही उद्योग

२००५ पासून पिंपरी-चिंचवड येथील पी थ्री नावाच्या बांधकाम कंपनीत रायसोनी यांच्यासोबत प्रशांत मणिलाल संघवी, संदेश मिश्रीलाल चोपडा, प्रदीप पोपटलाल कर्नावट हे भागीदारीत आहेत. या व्यवसायासाठी १० कोटी रुपये बीएचआर पतसंस्थेतून कॅश क्रेडिट कर्ज उचल केल्याचा जबाब संघवी यांनी पोलिसांना दिला आहे. संघवी हे रायसोनी यांचे भाचे आहेत.
आता मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न

महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या संस्थांच्या संचालकांची मालमत्ता जप्त करून त्यातून येणारा पैसा ठेवीदारांना परत केला जातो. रायसोनी आणि कुटुंबीयांनी ठेवीदारांच्या पैशाने अनेक उद्योगात भागीदारी केली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई व्हावी, यासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याचे बीएचआर ठेवीदार संयुक्त समितीचे राज्याध्यक्ष विवेक ठाकरे व अॅड. हरूल देवरे यांनी सांगितले.
रायसोनींच्या कुटुंबीयांवर प्रथमच अपहाराचा गुन्हा

बीएचआरच्या अमरावती येथील शाखेत दोन लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राधेश्याम झुंबनलाल चांडक (६७, रा. अमरावती) असे फिर्यादीचे नाव आहे. या गुन्ह्यात रायसोनींसह संचालक व कुटुंबीयांनाही संशयित करण्यात आले आहे. या गुन्ह्यात एकूण २३ संशयित आहेत. आतापर्यंत दाखल गुन्ह्यांमध्ये पहिल्यांदाच रायसोनी यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी व जावई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रायसोनींच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्ता बीएचआरमध्ये झालेल्या अपहाराच्या रकमेतूनच खरेदी झाल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.