आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाणीच्या विरोधात एसटी संघटनांनी मागितले संरक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - एसटी परिवहन महामंडळातील वाहक व चालकांना वारंवार होणार्‍या मारहाणीच्या विरोधात आगारातील सर्व कर्मचारी संघटनांनी पोलिस अधीक्षकांकडे आपल्या व्यथा मांडल्या. कर्मचार्‍यांना संरक्षणाबरोबरच गुन्हेगारांना कडक शासन देण्याची मागणी केली. या वेळी मारहाण करणार्‍यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवरही कारवाई करण्याचे आश्वासन एसटी संघटनेच्या कृती समितीस दिले.
गेल्या महिन्याभरात पाच वेळा बसचालक व वाहकांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. किरकोळ वादावरून या घटना घडत आहेत. तक्रारी देऊनही गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्याने या घटना वाढीस लागल्या आहेत. या विरोधात आगारातील सर्व संघटना एकवटल्या होत्या. अखेर संतप्त कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांच्यापुढे व्यथा मांडल्या.
संरक्षणासह नो पार्किंग झोन मध्ये झालेले अतिक्रमण, आगारातील अतिक्रमण व सुरक्षा या विषयीही कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्या. या वेळी एसटी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष योगराज पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश चांगरे, आर.के.पाटील, जनरल इंटकचे विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्रसिंग राजपूत, पी.बी. देशमुख, अनिल पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, राजेंद्र चौधरी, यांत्रिक कामगार सेनेचे पी.टी. पवार, कामगार सेनेचे निशिकांत प्रधान, विभाग नियंत्रक डी.एम. कदम, अ.वा. गारुंगे आदी उपस्थित होते.