आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात शहर बसफेर्‍या रद्द; विद्यार्थ्यांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एस.टी. महामंडळासह जेएमटीयूच्या धावणार्‍या बसफेर्‍या कमी झाल्यामुळे दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बहुतांश फेर्‍या गाड्या नादुरुस्त, टायर पंक्चर असल्याने बंद आहेत. याचा त्रास अप-डाऊन करणार्‍यांना सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळी उमवि, महाबळ यासह आसोदा, भादली, शिरसोली, मोहाडी या भागातील हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. ऐनवेळी बसेस न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. संततधार व खड्डय़ांमुळे झालेली रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ही स्थिती होत असल्याचे एसटी महामंडळ व जेएमटीयूच्या सूत्रांनी सांगितले.

टायर अभावी फेर्‍या रद्द

सोमवारी सकाळी जुने बसस्थानकावरील तीन बसेस पंक्चर झाल्यामुळे नशिराबादसह खेडी, कढोली मार्गावरील काही फेर्‍या रद्द केल्या होत्या. नवीन बसस्थानकातूनही सुटणार्‍या 5 ते 6 शहर बसेस पंक्चर असल्याने फेर्‍या रद्द केल्या गेल्या. जेएमटीयूच्याही 15 पैकी 5 बसेस दुरुस्तीसाठी गेल्याने याचा परिणाम बसफेर्‍यांवर झाला. श्रावण सोमवार असल्याने प्रवाशांची अधिक गर्दी असल्याने रिक्षाचालकांनी भाडेवाढ करून प्रवासी भरले.

उत्पन्नदेखील घटले
शहर बससेवेसाठी महामंडळाच्या सात बसेस सुरू आहेत. यापूर्वी 20 ते 22 बसेस शहराच्या विविध भागांत धावत होत्या. मात्र, याकडे महामंडळाने दुर्लक्ष केल्याने सात बसेसवर बसस्थानक सुरू आहे. परिणामी प्रवासी वर्गही कमी झाल्याने उत्पन्नही घटले आहे.

खड्डय़ांमुळे टायर पंक्चर
संततधारेमुळे खड्डय़ांची खोली अधिक वाढली आहे. परिणामी टायर पंक्चर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नवीन बसस्थानकात दुरुस्तीसाठी 15 ते 20 बसेस दररोज असतात. यात गाडी पंक्चर अथवा टायर फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश बसेसचे टायर जुने झालेले आहेत. मात्र, आगार प्रशासनाकडून नवीन टायर मिळत नसल्याने जुनीच टायर वापरावी लागत असल्यामुळे बसफेर्‍या कमी झाल्या.
-एस.बी.खडसे, आगार प्रमुख