आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका : अक्षय्य तृतीयेच्या बाजारात अवकाळी पावसाची छाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला व्यावसायिक उलाढाल वाढून बाजाराला चैतन्य प्राप्त होते. मात्र, दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा या सणाच्या मुहूर्तावर सुवर्ण, रियल इस्टेट आणि वाहन बाजारावरही अवकाळी पावसाचे सावट दिसून आले. तर अक्षय्य तृतीयेच्या पारंपरिक पूजेसाठी किरकोळ बाजारात मात्र तेजी होती.
वर्षभरात अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास पळाला आहे. कापसाला भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. शेतकऱ्यांच्या हाती पैसा पडल्याने पुढील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. सुवर्ण बाजारपेठेतील विक्रीवर गेल्या अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत ३५ ते ४५ टक्केपर्यंत परिणाम झाला आहे.

एरवी अक्षय्य तृतीयेला शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर खरेदी केली जाते. मात्र, या वेळी शेतकऱ्यांनी हात आवरता घेतला आहे. दुचाकी, डंपर इतर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीवरही १० ते ३० टक्के परिणाम झाला आहे. नवीन घराची खरेदी किंवा बुकिंगसाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधला जातो. मात्र. यावर्षी रियल इस्टेट व्यवसायावरही मंदीचे सावट दिसून आले आहे.

किरकोळ खरेदीचा बाजार मात्र तेजीत

अक्षय्य तृतीयेला पितृश्राद्ध घालण्याची परंपरा असल्याने यासाठी किरकोळ खरेदी बाजार तेजीत होता. घागर, आंबे, डांगर खरेदीला मंगळवारीदेखील चांगला प्रतिसाद मिळत होता. दोन दिवसांपासून तेजीत आलेले आंब्याचे भाव दुपारी १० वाजेनंतर शंभरीच्या आत आले होते. केसर ७० ते ८० रुपये भावाने मिळत होता. ४० ते ५० रुपयाला मिळणारी घागर ७० रुपयांपर्यंत गेली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून अक्षय्य तृतीयेची सुटी जाहीर करण्यात आल्याने शासकीय नोकरदार खरेदीसाठी बाहेर पडलेले दिसत होते.

सोने खरेदीसाठी यंदा दरवर्षापेक्षा कमी गर्दी

दरवर्षी अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी ग्राहक येतात. मात्र, या वेळी सोने खरेदीसाठी येणारी गर्दी कमी आहे. एकंदरीत अवकाळी पावसाचा सराफ व्यापारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. सुशील बाफना, संचालक बाफना ज्वेलर्स

सराफ बाजारात खरेदीचे प्रमाण २५ टक्के घटले

अवकाळी पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. सोने खरेदी करणाऱ्यांचे सराफ बाजारातील प्रमाण सरासरीपेक्षा २५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. अजयललवाणी, संचालक महावीर ज्वेलर्स

दुचाकी,चारचाकी वाहन बाजारावर मंदीचे सावट

दरवर्षी अक्षय्य तृतीयेला सर्वच कंपन्यांचा वाहन बाजार तेजीत असतो. मात्र, या वेळी दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि कृषीशी संबंधित विविध कंपन्यांच्या वाहन विक्रीवर परिणाम झाल्याची स्थिती आहे. किरणबच्छाव, संचालक सातपुडा ऑटो

काही वर्षांच्या तुलनेत रियल इस्टेट मार्केट थंड

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा अक्षय्य तृतीयेला रियल इस्टेट मार्केट प्रचंड थंड झाले आहे. त्यामुळे नवीन योजना सुरू कराव्यात किंवा नाही, या विचारात बांधकाम व्यावसायिक आहेत. आशुतोष पाटील, संचालक, तुलसी कन्स्ट्रक्शन्स