आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७० % विकासाचा निकष; शहराची हद्दवाढ रखडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव शहरात विकास कामे ठप्प पडली आहेत. उत्पन्नाचे नवीन मार्ग नसल्याने तिजोरीत खणखणाट आहे. त्यात धुळ्याप्रमाणे जळगावचा नवीन हद्दीवाढीचा विषयही सध्यातरी शक्य वाटत नाही. हल्लीच्या हद्दीत केवळ ४० टक्केच विकास झाला असून नव्याने हद्द वाढवण्यासाठी किमान ७० टक्के विकास साधला जाणे अपेक्षित असतो. शहराच्या आहे त्या हद्दीत विकास झाला नसल्यामुळेच हद्दवाढ रखडली आहे; मात्र भविष्यात आजूबाजूच्या किमान सात गावांचा समावेश अटळ आहे.

मागच्या आठवड्यात शासनाच्या नगरविकास विभागाने धुळे महापालिकेत १६ गावांचा समावेश करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. सन १९७३ नंतर पहिल्यांदाच धुळे शहराची हद्दवाढ होत आहे. त्याच धर्तीवर सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्येही जळगाव महापालिकेच्या हद्दवाढीची चर्चा रंगत आहे. महापालिकेची हद्दवाढ झाल्यास कोणत्या गावांचा समावेश होऊ शकतो, त्यांचा फायदा-तोटा यावरही खल होत आहे. परंतु, सध्या जळगाव शहराच्या हद्दवाढीची शक्यता कमीच आहे. सन २००२मध्ये जळगावची हद्दवाढ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतरच आसोदा रेल्वे गेट ओलांडून गावाकडे नवीन हद्दीचे फलकही लावण्यात आले होते. शासनाने केलेल्या हद्दवाढीमुळे कुसुंबा, आसोदा, मन्यारखेडा, मोहाडी शिवारातील बराचसा भाग पालिका हद्दीत आला आहे. फक्त गावांचा समावेश होऊ शकलेला नाही.

उत्पन्नापेक्षा विकासकामांवर अधिक खर्च
शहराची हद्दवाढ होणे काळाची गरज आहे. परंतु सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे; आहे त्या हद्दीतच कामे करणे अशक्य होत आहे, त्यात नवीन हद्दवाढ केली आणि त्या ठिकाणांहून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर तेथील विकास कामांवरच उलट खर्च वाढणार आहे. त्यामुळे सध्यातरी हद्दवाढीचा विचार करणे योग्य होणार नाही. - नितीनलढ्ढा, नेते, खाविआ.

सन १९८७मध्ये झाला होता विस्तार
जळगावमहापालिकेची सन १९८७मध्ये हद्दवाढ झाली होती. तेव्हा पिंप्राळा, निमखेडी, मेहरूण तसेच जळगावचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर पिंप्राळा निमखेडी तसेच मेहरूण ग्रामपंचायतीचे महापालिकेत रूपांतर झाले होते. आता या गावांमध्ये नगरसेवकांचे नेतृत्व आहे. महापालिका होऊनही अद्याप या भागांचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही.

आजतरीहद्द वाढीचा प्रस्ताव नाही
सावखेडागावाचा प्रस्ताव यापूर्वी शासनाकडे पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सध्या महापालिकेच्या हद्दीत विकासाला भरपूर वाव आहे. त्यामुळे आजतरी महापालिकेच्या हद्दवाढीची गरज नाही. या पूर्वी २००२ मध्येच हद्दवाढ केली आहे. चंद्रकांतनिकम, सहायक संचालक, नगररचना विभाग

आणखी ७० टक्के विकासाची गरज
शहराचीहद्दवाढ होण्यासाठी सध्या असलेल्या हद्दीच्या ७० टक्के विकास साधला जाणे अपेक्षित असते. परंतु, जळगावचा अद्याप ४० टक्केच विकास साधला गेलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रवाढीसाठी आणखी किमान ते १० वर्षे लागण्याची शक्यता आहे; असे झाल्यास भविष्यात मोहाडी, कुसुंबा, मन्यारखेडा, आसोदा, भादली, आव्हाणे, फुपनगरी आदी गावांचा महापालिकेत समावेश होऊ शकेल.

सावखेडा गाव प्रतीक्षेत
सध्याविविध समस्यांनी त्रस्त असलेल्या सावखेडा शिवारातील नागरिक त्यांना महापालिका क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासाठी आग्रही आहेत. पाण्याच्या समस्येतून मुक्तीसाठी वाघनगर भागातील नागरिक वारंवार महापालिकेत येऊन हद्दवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आग्रह धरतात. महापालिकेनेही १५ वर्षांपूर्वी सावखेडा गावाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. परंतु, त्यावर अद्याप कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.