आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळाला संजीवनी द्यायला ‘गोदावरी’ची टीम आली पुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शास्त्री टॉवरवरील अफलातून घड्याळाला नवसंजीवनी द्यायला गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून महापालिकेला दोन पर्याय देण्याची तयारी चालवली आहे. महापालिकेनेही या विद्यार्थ्यांना घड्याळाचा मार्ग खुला करून देऊन या ऐतिहासिक घडाळय़ाची टिकटिक सुरू करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे.

एकाच यंत्रावर चार बाजूंची घड्याळे चालणार्‍या या अफलातून यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकल मिळत नसल्याने चार वर्षांपासून शास्त्री टॉवरवरील हे घड्याळ बंद अवस्थेत आहे. या संदर्भात मंगळवारी ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करीत शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना दुरूस्तीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. असा पुढाकार कोणी घेतला तर त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाला केले होते. त्याला प्रतिसाद देत मंगळवारी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगचे गोदावरीचे शिक्षक मिलिंद धनके, विद्यार्थी अक्षय सरोदे, भारत तनवाणी, ललित तनवाणी, निखिल रोटे यांनी मनपाचे अभियंते अनिस शेख यांच्यासह पाहणी केली आणि दुरुस्तीसाठी तयारीही दर्शविली आहे. त्या संदर्भातला अहवाल ते महापालिकेला देणार आहेत. त्यानंतर पालिकेच्या परवानगीने प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू करतील.