आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलचे नूतनीकरण - मृतदेहांची हेळसांड थांबणार, आचारसंहितेमुळे काम लांबले होते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बहुप्रतीक्षित असलेल्या सिव्हिलमधील शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. संरक्षण भितीचे काम शुक्रवारी सुरू झाले असून, पूर्ण कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राजेंद्र जंगले यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
नूतनीकरणासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने २० जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला २९ लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला. मात्र, तेव्हा लोकसभेची आचारसंहिता असल्याने तत्काळ नूतनीकरण सुरू करता न आल्याचे जंगले यांनी सांगितले.

अशी असेल नवी ‘पीएम रूम’
नवीन पीएम रूममध्ये चार खोल्या असतील. त्यात डॉक्टरांना बसण्यासाठी एक स्वतंत्र दालन, मृताच्या नातेवाइकांना बसण्यासाठी एक खोली, शवविच्छेदनासाठी एक आणि अनोळखी मृतदेह ठेवण्यासाठी असलेल्या शवपेट्यांकरिता एक अशा चार मोठ्या खोल्यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक खोलीत एसी व सीसीटीव्ही असेल.

सध्याच्या ‘पीएम रूम’ची स्थिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील सध्याच्या शवविच्छेदनगृहात केवळ तीन खोल्या आहेत. त्यात डॉक्टरांसाठी एक, शवविच्छेदनासाठी एक आणि एक खोली बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी आहे. बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटी मात्र नाही. त्यामुळे मृतदेहाच्या आजूबाजूला बर्फ ठेवून तो सांभाळावा लागत असल्याने दुर्गंधी पसरते. परिणामी, संबंशित डॉक्टर, कर्मचारी आणि मृत व्यक्तीच्या नातेवाइकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कशासाठी किती खर्च
नूतनीकरणासाठी रुग्णालयाने बांधकाम विभागाला २० जून २०१४मध्ये २९ लाखांचा निधी दिला. त्यातून बांधकामासाठी १६ लाख खर्च करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित १३ लाखांचा निधी एसी व इतर इलेक्ट्रीकल कामासाठी वापरला जाणार आहे.

नूतनीकरणापर्यंत समोरच्या खोलीत पीएम
शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत सध्याच्या शवविच्छेदनगृहासमोर असलेल्या खोलीत शवविच्छेदन होईल अशी माहिती अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली.