आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमुळे वाढली भरीताला मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - थंडीत कमालीची वाढ झाली आहे. त्यात भरीत पार्ट्यांची मेजवाणी हा वेगळाच आनंद आहे. बाजारात अव्वल स्थान टिकवून असलेल्या बामणोद, आसोद्याची वांग्यांना मागणी वाढली असून शहरातील प्रमुख भरीत विक्री केंद्रावरही गर्दी वाढली आहे.
आहारात वैविध्य ठेवणारे खान्देशवासीय आपली वैशिष्ट्ये अभिमानाने जपत आहेत. उन्हाळ्यात वरणबट्टी, वांग्याची भाजी, हिवाळ्यात वांग्याचे भरीत हा इथला महत्त्वाचा मेनू. पाश्चात्यांच्या संस्कृतीतील पिझ्झा, फास्टफूडचा नागरिकांनी स्वीकार केला असला तरी मातीवर भाजलेल्या वांग्याच्या भरिताची मागणी वाढतच आहे.
भरीत विक्री केंद्र वाढले
भरिताची मागणी करणारा ग्राहकवर्ग समोर ठेवून व खवय्यांच्या जिभेचे लाड पुरविण्यासाठी तयार भरिताची विक्री केंद्रे उभारून खान्देशी भरीत पुरविले जात आहे. शहरातील मध्यवर्ती भागात पाच ते सात केंद्रांमधून भरिताची विक्री सुरू आहे. मागणी वाढताच अन्य हॉटेलमध्ये भरीत उपलब्ध केले जाते, असे व्यावसायिकांनी सांगितले. भरताच्या वांग्यासंदर्भात आसोदा व बामणोदचे स्थान अनेक वर्षांपासून अव्वल राहिले आहे. हिवाळ्यातील हुडहुडी वाढवणाºया थंडीत जेवणातला आहार म्हणजे भरीतच हे जणू ठरलेलेच. यासाठी काटे, काड्यांची गरज नाही. पार्सल पॅकिंगने केव्हाही भरीत खाण्याची इच्छा पूर्ण होऊ लागली आहे.
25 रुपये प्लेटने विक्री
25 रुपये प्लेट असा सध्याचा दर आहे. विक्री केंद्रामध्ये जेवणाबरोबरच तवा भाकरी, तळलेली मिरची, खान्देशी ठेसा पार्सलमधून देण्याची सुविधा व्यावसायिकांनी केली आहे. मध्यवर्ती भागात ही दुकाने असल्याने दुपारच्या जेवणाच्या वेळेत या भागात नोकरदार व्यावसायिकांची भरीत खाण्यासाठी गर्दी दुकानाभोवती दिसते. गर्दीमुळे दुकानात आलेल्या ग्राहकांच्या वाहनांच्या व्यवस्थेसाठी व्यावसायिकांनी स्वतंत्र सुरक्षारक्षकही नेमला आहे. जुन्या भिकमचंद मार्केट परिसरातील भरीत सेंटरवर हे दृश्य दिसते. मागील आठ वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे.
शेतकरी भाजतात वांगी
४ग्रामीण भागातील शेतकरी मजुरीने वांगी भाजून देतात. व्यावसायिकांकडून एक पोते भाजण्याचे 400ते 450 रुपये घेतले जातात. भाजून, सोलून ठेचणे हे त्यांचे काम असते. ग्राहकांना थंडीत भरीत खाण्याचा आनंद वाटतो. यामुळे या दिवसात विक्रीचे प्रमाण चारपटीने वाढते, तसे वर्षभर भरीत ठेवतो. गावावरून काट्यावर वांगी भाजून आणतो. रात्री उशिरापर्यंत पार्सलने ग्राहकांची मागणी सुरूच असते.
अशोक भोळे, कृष्णा भरीत सेंटर
असे बनवितात भरीत
आसोदा, बामणोद परिसरातील काळी (विना कोपलेली) वांगी शेतांमध्ये काट्यावर भाजली जातात. यात शेंगदाणा, मिरचीची फोडणी देऊन चव आणली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार तिखटाची चव ठेवली जात असल्याचे व्यावसायिक सांगतात. एकावेळी 50 माणसे बसतील एवढी व्यवस्था या केंद्रात आहे. दिवसाला सात ते आठ पोती वांगी लागतात. शेतात वांगी भाजणे तयार करणे यासाठी स्वतंत्र माणसे आहेत. रविवारी केंद्रावर अधिक गर्दी असते. आर्डरनुसार सुविधाही पुरविली जाते. दुकानात आलेल्या ग्राहकांना व पार्सलमध्ये भरिताबरोबर तळलेली साधी मिरची, कांदे, मुळे, पापड पुरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे, मुंबईचे लोक जाताना तयार भरीत बरोबर घेऊन जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शहराच्या नव्या बी. जे. व्यापारी संकुलातही दोन भरीत सेंटरचे दुकान आहे. लग्नसमारंभ पार्टी, सभा अशा विविध कार्यक्रमाप्रसंगी आॅर्डर घेऊन भरीत उपलब्ध करून देत असल्याचे तिघांनी सांगितले. तर शेतात, मळ्यात, उद्यानात आता भरीत पार्ट्या रंगू लागतील. जानेवारीअखेर भरिताची चव चांगली राहत असल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले.