आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव- गेल्या काही दिवसांपासून राजीनामा देण्याच्या मानसिकतेत असलेल्या नगरसेवक पांडुरंग काळे यांनी अखेर आगामी राजकारणाची रणनीती आखल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकला. या वेळी त्यांनी पालिकेत आयुक्तांच्या नावाने स्वीकृत नगरसेवक पदाचाही राजीनामा सादर केला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या पवित्र्यामुळे ते काय भूमिका घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. दोन दिवसांतील हालचाली पहाता ते भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे.
आमदार सुरेश जैन नगराध्यक्ष असताना सन 1985 साली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आतापर्यंत नगरपालिका व महापालिकेच्या सभागृहात असलेले पांडुरंग काळे यांनी आमदार जैन यांच्यासह भारतीय जनता पक्ष व गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत ते होते. त्यानुसार काळे यांनी सोमवारी दुपारी 5 वाजता उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांचे कार्यालय गाठून राजीनामा सादर केला. तो मंजूर करण्याचा अधिकार आयुक्त संजय कापडणीस यांना असल्याने त्यावर आयुक्त आल्यानंतर निर्णय होणार आहे. वैयक्तिक कारणास्तव स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्याकडे त्यांनी पाठवला आहे. भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीत दाखल झालेले काळे पाच वर्षांनंतर पुन्हा राष्ट्रवादी सोडत असल्याने त्यांच्या आगामी हालचालींसंदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. '
भाजपकडे जाण्याची शक्यता
2003 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झालेले पांडुरंग काळे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काळे यांनी एकनाथ खडसेंशी रविवारी चर्चा केली. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रातील मजकूर असा
मी पांडुरंग रघुनाथ काळे, वय 61 रा. 33, ओंकारनगर, जिल्हापेठ जळगाव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्वीकृत सदस्य आहे; परंतु माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी राजी खुशी स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. राजीनामा मंजूर करावा, ही विनंती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.