आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगारासाठी कर्मचारी संपावर, महापालिकेत शुकशुकाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दोन महिन्यांपासून बिनपगारी काम करणाऱ्या महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. शेकडो कर्मचाऱ्यांनी सकाळीच पालिका गेटसमोर ठिय्या आंदोलन देत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. दररोज सकाळी गजबजलेल्या १७ मजली भव्य इमारतीत सोमवारी शुकशुकाट होता.

महापालिका उपायुक्त अविनाश गांगोडे ड्यूटीवर येताच कर्मचाऱ्यांनी त्यांची मोटार दारातच अडवली. संघटनेच्या नेत्यांनी गांगोडे, उपायुक्त प्रदीप जगताप यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांचे समाधान झाले नाही. दरम्यान, आंदोलनावरून कर्मचारी संघटनांमध्ये फूट पडली आहे. खाती गोठवण्याची कारवाई न्यायालयीन असल्याचे सांगून सफाई मजदूर काँग्रेस आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

पालिका कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार व निवृत्ती वेतन मिळालेले नाही. त्याविरोधात शहीद भगतसिंग कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय मजदूर संघातर्फे काम बंद आंदोलन पुकारले आहे. सकाळी १० वाजेपासून पालिकेच्या प्रवेशद्वारातच कर्मचारी ठिय्या मांडून बसले होते. कामावर जाण्यास कर्मचाऱ्यांनाही संबंधितांनी मज्जाव केल्याने दिवसभर उपायुक्त आणि आस्थापना विभाग वगळता इतर विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. उपायुक्त प्रदीप जगताप सकाळी ११.३८ वाजता पालिकेत आल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, मात्र कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. शिपायास सांगून त्यांनी दालन ११.३० वाजता उघडले.
दिवसभर पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दालनांमध्येही शुकशुकाट होता. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, पालिकेत एकूण २२१२ कर्मचारी आहेत. त्यातील सुमारे २०० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, १४०० कर्मचारी सहभागी झाल्याचा संघटनांनी दावा केला.

उपायुक्तांचे वाहन अडवले
पालिकेत ११.५० वाजता दाखल झालेल्या अविनाश गांगोडे यांचे वाहन आतमध्ये जाऊ देण्यास आंदोलकांनी मज्जाव केला. त्यामुळे वाहन बाहेर लावून त्यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांचेही पगार झालेले नाही. हे प्रशासनाच्या चुकीमुळे नव्हे तर न्यायालयाच्या निर्देशाने ही अडचण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची इच्छा असेल त्यांना जाऊ द्या, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.

डीआरटी कोर्टात प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांची बाजू न मांडल्याने त्यांच्या चुकीची शिक्षा कर्मचाऱ्यांना होत आहे. या आंदोलनात मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. अनिल नाटेकर,

अध्यक्ष, शहीद भगतसिंग कर्मचारी संघटना
खाती गोठवणे ही न्यायालयीन कारवाई आहे. त्यात प्रशासनाचा काहीही दोष नसल्याने आमचा काम बंद आंदोलनाला पाठिंबा नाही. सनदशीर मार्गाने या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी संघटना योग्य तो प्रयत्न करेल.दिलीप चांगरे,

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस
^आंदोलनात कुठल्या विभागाचे किती कर्मचारी सहभागी झाले होते, या संदर्भातील अहवाल सर्व विभाग प्रमुखांकडून मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधितांवर विनावेतन रजा, सेवा खंडन, शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. अविनाश गांगोडे, उपायुक्त