आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाळेधारकांसाठी पुन्हा 30 वर्षांचा ‘गळ’; भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांचा ठरावाला विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - व्यापारी संकुलांची मुदत संपल्याने 30 वर्षांसाठी नव्याने करार करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. महापौर आणि आयुक्त यांच्या अनुपस्थितीत ‘प्रभारीं’नी ही सभा चालविली. महात्मा फुले मार्केटमधील व्यापार्‍यांच्या एका गटाचा या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे त्यांनी या ठरावाचा निषेध करीत सोमवारी दोन तास दुकाने बंद ठेवली. दरम्यान, राज्य शासनाकडे यापूर्वीच 30 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव पडून असल्याने नव्या ठरावाला मान्यता मिळवून आणण्याचे आव्हान सत्ताधार्‍यांसमोर आहे.

शहरातील महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटसह महापालिकेच्या सहा मार्केटमधील गाळेधारकांच्या कराराची मुदत संपल्याने नव्याने करार करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. महापौर जयर्शी धांडे यांच्या गैरहजेरीत पीठासीन अधिकारी म्हणून स्थायी समितीचे सभापती रमेश जैन यांनी सभेचे कामकाज हाताळले. व्यापारी संकुलांच्या नव्या करारासंदर्भात राज्य शासनाकडे यापूर्वी दोन ठराव पाठवण्यात आले होते. दोन्ही ठराव निलंबित असताना नव्याने ठराव करणे कायद्याला धरून नसल्याची शंका गणेश सोनवणे व नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केली. गटनेते नितीन लढ्ढा, सुरेश भोळे, करीम सालार, अशोक लाडवंजारी, इब्राहीम पटेल यांनीही या चर्चेत भाग घेतला. प्रशासनातर्फे कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच हा ठराव सभागृहासमोर ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले; मात्र तरीही भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडीने सावध पवित्रा घेत ठरावाला पाठिंबा दिला नाही.

पालिका प्रशासन प्रस्तावावर ठाम
व्यापारी गाळेधारकांसाठी नव्याने ठराव करण्याकरिता कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आली आहे. चालू बाजारभावाप्रमाणे प्रीमियम आकारून 30 वर्षांपर्यंत करार करण्यात कोणतीही अडचण नाही. विना मोबदला व्यापार्‍यांना गाळे किंवा मालमत्ता देण्याचा विषय कायदेशीर नसल्याचा खुलासा उपायुक्त भालचंद्र बेहरे यांनी सभागृहासमोर केला.

ठरावाला कायदेशीर हरकत
पालिकेने यापूर्वी याच विषयासंदर्भात ठराव क्रमांक 1231 व 1275 मंजूर करून शासनाकडे पाठवले होते. त्यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याने नव्याने ठराव करणे कायद्याला धरून नाही, असा युक्तिवाद करत नवीन ठरावाला महानगर विकास आघाडीचे गटनेते नरेंद्र पाटील यांनी कायदेशीर हरकत नोंदवली.

नगरसेवकांना प्रवेशासाठी कुपन
महासभेत इतर नागरिकांना प्रवेश करता येऊ नये म्हणून नगरसेवकांना प्रथमच कुपन वितरित करण्यात आले होते. कुपन आणणार्‍या नगरसेवकांनाच प्रवेश देण्यात येत होता. तथापी, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्यावर काही व्यापारीही सभागृहात येऊन बसले होते. याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले.

पालिकेचा 99 वर्षांचाही करार
भाजपचे सदस्य विजय गेही यांनी 99 वर्षांचा करार होत असल्यास 100 टक्के प्रीमियम भरण्यास व्यापारी तयार असल्याचा प्रस्ताव मांडला. 30 वर्षांच्या कराराला अडचण नाही; मात्र 99 वर्षांचा करार मान्य केल्यास शासनाच्या मान्यतेच्या अधीन राहून 99 वर्षांचा करारही पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गटनेत्यांची बैठक निर्थक
महासभेत विषय आल्यावर गटनेत्यांना त्यासंदर्भात पूर्ण माहिती व्हावी म्हणून सत्ताधारी पक्षातर्फे शनिवारी अधिकारी व सर्व गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर सभागृहात एकमताने हा ठराव पारित होणे सत्ताधार्‍यांना अपेक्षित होते; मात्र गटनेत्यांच्या बैठकीचा महासभेसाठी काही फायदा झाला नाही.

दोन तास मार्केट बंद
व्यापारी संकुलांची मुदत संपल्याने महासभेत होणार्‍या ठरावाचा निषेध करण्यासाठी महात्मा फुले मार्केटमधील व्यापार्‍यांनी सकाळी दोन तास व्यापार बंद ठेवला होता. ठरावीक व्यापार्‍यांच्या सांगण्यावरून 30 वर्षांचा करार करण्यात येत असल्याचा आरोप बंदमध्ये सहभागी झालेल्यांनी केला आहे.