आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुडकोची लबाडी; मनपाविरुद्ध षड‌्यंत्र, मनपा स्थायी समितीत नगरसेवकांचा घणाघाती आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्ज वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) हुडकोला कर्जापोटी ३४० कोटी रुपये भरण्याचे अदा करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद शनिवारी मनपा स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. डीआरटी निकालाविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले असून एकतर्फी निकालबद्दल सर्वच सदस्यांनी संताप व्यक्त केला.
हुडकोच्या बाजूने दिलेला निकाल म्हणजे एकप्रकारे पालिकेविरुद्ध षड्यंत्र आहे. हुडकोने लबाडी करुन डीआरटीकडून आपल्या बाजूने आदेश करवून घेतल्याचा गंभीर आरोप खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी स्थायी समितीत केला. हुडको डीआरटीने हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असून या अन्यायाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातही तक्रार करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
आयुक्तांची माहिती आणि तणाव

स्थायी समितीत अजेंड्यावरील विषयांची चर्चा आटोपल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी न्यायालयीन विषयाची माहिती दिली. डीआरटीने पालिकेला ३४० कोटी रुपये भरण्याची डिक्री ऑर्डर काढल्याचे सांगताच नगरसेवकांसह अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव पाहायला मिळाला.
अॅड.ढाकेबाजू मांडणार

पालिकेची बाजू मांडल्याची नोंद असलेल्या अॅड.केतन ढाके यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र शपथेवर साक्ष देण्याची तयारी दाखवली आहे. आजपर्यंत डीआरटी कोर्टात पाय ठेवला नसताना माझ्या नावाचा उल्लेख कसा केला? हा प्रश्न आहे. ही सरळ सरळ फसवणूक असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

पुढे काय ?

खाती सील करण्याचे संकट : डीआरटीच्या निकालामुळे हुडको पुन्हा एकदा पालिकेचे बँक खाती सील करणे अथवा अन्य कारवाई येत्या १५ दिवसांत करण्याची शक्यता आहे. निकालाविरोधात डीआरटी कोर्टात अपील करून स्थगिती मिळवण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. त्यासाठी ३४० कोटींच्या २५ टक्के म्हणजे ८५ कोटी रुपये भरावे लागतील. यासाठी वरिष्ठ विधिज्ञांचा सल्ला घेण्याचे काम सुरू आहे.

आयुक्तांना धक्का

डीआरटी न्यायालयाच्या निकालमुळे आयुक्त कापडणीस यांनाही धक्का बसला आहे. उच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना नव्याने झालेल्या निर्णयाने अचंबित झाल्याचे ते स्थायी समितीच्या बैठकीत म्हणाले. निकालविरोधात १५ एप्रिलला उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान पालिकेची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञांची नियुक्तीचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी स्थायीच्या सदस्यांना केले.

२०११ पासून व्याज आकारणी

डीआरटी कोर्टाच्या निकालात मागितलेली ३४० कोटी रुपयांच्या रकमेवर जेव्हापासून दावा सुरू आहे, तेव्हापासून म्हणजे २०११ पासून वार्षिक १२ टक्के व्याजासह आकारणी केली जाईल. ही आकारणी पालिका कर्जफेड करत नाही तोपर्यंत राहणार आहे. दाव्यापोटी हुडकोला लागलेला न्यायालयीन खर्चही महापालिकेच्या तिजोरीतून द्यावा लागणार आहे.

दोन वेळा रिसेटिंग

पालिकेने घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीमुळे हुडकोने पालिकेचे खाते एनपीए घोषित केले. त्यानंतर २००४मध्ये रिसेटिंग करण्यात आले. मात्र, त्यानंतरही हप्त्यांची परतफेड होऊ शकली नाही, म्हणून पुन्हा २००८ मध्ये रिसेटिंग केले. परंतु, त्यानंतर हुडकोने डीआरटीत धाव घेऊन पालिकेला १२९ कोटी भरण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर पालिकेवर बँक खाती सील होण्याची नामुष्की ओढवली होती.

तक्रार करण्याचा निर्णय

पालिकेवरील संकटातून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी सकाळी महापौर राखी सोनवणे यांच्या उपस्थितीत आयुक्त संजय कापडणीस, उपमहापौर सुनील महाजन, खाविआचे नेते नितीन लढ्ढा, गटनेते नितीन बरडे, भाजपचे डॉ.अश्विन सोनवणे, जनक्रांतीचे सुनील पाटील, विरोधीपक्षनेते वामनराव खडके यांची बैठक झाली. यात निकालाविरुद्ध दाद मागण्यावर एकमत झाले. पालिकेची ही फसवणूक असून याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णयही लोकप्रतिनिधींनी घेतला.

निकालाबाबत संशय वाढण्याची कारणे

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने एकीकडे हुडकोसोबत एकरकमी परतफेडीची बोलणी सुरू आहे, तर दुसरीकडे डीआरटी ने दिलेल्या ३४० कोटी ७४ लाख ९८ हजार ६२७ रुपये २९ पैसे भरण्याच्या आदेशाने महापालिका हादरली आहे. विशेष म्हणजे, डीआरटीत अशा प्रकारची सुनावणी झाली, याचा पालिकेला थांगपत्ताही लागू देण्यात आला नाही. यासंदर्भातील पालिकेच्यावतीने अॅड.जितेंद्र गायकवाड काम पाहत आहेत. असे असताना पालिकेच्यावतीने जळगावचे अॅड.केतन ढाके यांनी हजर होऊन बाजू मांडल्याचा उल्लेख डिआरटीच्या आदेशात आहे.
वास्तविक अॅड.ढाके हे कधीही डीआरटी न्यायालयात गेलेच नाहीत. त्यामुळे डीआरटी कोर्टाने दिलेला निकाल हा पूर्णपणे लबाडी, बनवेगिरी असल्याचा अंधारात ठेवल्याचा संशय स्थायी समितीत व्यक्त करण्यात आला. याप्रकरणात प्रशासन तक्रार करत नसेल, तर स्वत:च्या नावाने उच्च पातळीवर तक्रार करण्याची तयारी नितीन लढ्ढा यांनी दाखवली आहे.