आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या मुदत संपलेल्या वादग्रस्त गाळ्यांसाठी नवीन करार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकेच्या मुदत संपलेल्या विविध मार्केटमधील गाळेधारकांसोबत पुढील ३० वर्षांसाठी करार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, काही गाळेधारकांनी दुकानाच्या मूळ बांधकामाच्या रचनेत मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याची बाब सर्वेक्षणादरम्यान निदर्शनास आली आहे. अशा गाळ्यांमुळे मार्केटच्या बांधकामालाच धोका उद्भवला असल्याने संबंधित गाळेधारकांसोबत नव्याने करार न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पालिका प्रशासनातर्फे मुदत संपलेल्या अडीच हजार गाळेधारकांना ३० वर्षांसाठी नवीन करार करून देण्यात येणार आहे. यासाठी गाळे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. सर्वेक्षणादरम्यान फुले मार्केट, भास्कर मार्केटमधील काही गाळेधारकांनी दुकानातील अधिक जागा वापरायला मिळावी यासाठी माळोचे टाकले आहेत. माळोचे टाकल्यावर दोन्ही ठिकाणी किमान सहा ते सात फूट जागा मिळावी यासाठी तळमजल्यावरील काही गाळेधारकांनी खाली खोदकाम केले आहे. अशा प्रकारे केलेल्या खोदकामामुळे मार्केटच्या बांधकाम रचनेलाच धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून गाळा पूर्ववत केला जात नाही तोपर्यंत संबंधितांसोबत करार केला जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
अतिक्रमित गाळ्यांनाही ना
पालिकेच्या कोणत्याही मार्केटच्या बांधकामाव्यतिरिक्त मार्केट आवारात करण्यात आलेल्या अतिक्रमित गाळेधारकांसोबत करार करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी त्यांच्यासोबत करार झाला असला तरी यापुढे मात्र करता येणार नाही. तसे केल्यास अनधिकृत बाबींचे समर्थन केल्याचे होईल, असेही आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले. फुले मार्केटसह इतर मार्केटमध्येही असे वादग्रस्त बांधकाम असण्याची शक्यता आहे.