आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Corporation Take Lead For Plastic Free City

प्लास्टिकमुक्तीसाठी जळगाव म‍हापालिकेचा पुढाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील कचरा व्यवस्थापनात सगळ्यात मोठी अडचण ठरणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याचे ठरवले असून, याबाबत लवकरच बैठक घेऊन नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने ‘स्वच्छ व सुंदर जळगाव शहर’ ही संकल्पना साकारण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.

दैनंदिन साफसफाई करताना मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. या पिशव्यांमधील विघटन न होणार्‍या रासायनिक पदार्थांमुळे स्वच्छतेच्या कामाला बाधा पोहोचते व त्यातून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हा ताण कमी करण्यासाठी व साचलेल्या गटारी आणि कचराकुंड्यांमधील घाणीला कारणीभूत ठरणार्‍या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीच्या हालचाली महापालिका प्रशासनात सुरू आहेत.

दुकानदारांना सूचना देणार
40 मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या प्रामुख्याने किराणा दुकान, भाजीपाला विक्री व किरकोळ विक्रीच्या दुकानांवर सहज उपलब्ध होतात. साहित्य घरापर्यंत आल्यानंतर ती पिशवी थेट कचर्‍यातून कुंडीत जाते. वजनाने हलक्या असलेल्या या पिशव्या हवेत उडतात. तसेच गटारीत जाऊन अडकतात. परिणामी, गटारी तुंबल्यामुळे डासांचे प्रमाण वाढते. पालिकेकडून गटारींची स्वच्छता होत असली तरी, दुसर्‍या दिवशी पुन्हा तीच स्थिती निर्माण होत असल्याचा अनुभव पालिकेच्या आरोग्य विभागाला येत आहे.

येत्या आठवड्यात बैठक
राज्य शासनाचे प्लास्टिक पिशव्यांसंदर्भाचे आदेश मिळाले असून, त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नियोजन केले जाणार आहे. भालचंद्र बेहेरे, उपायुक्त