आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅड. उज्ज्वल निकम हरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सोळा वर्षांपूर्वी केलेल्या पत्नीच्या खून खटल्याचा निकाल शनिवारी लागला. त्यात सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. देशविघातक कृत्य करणा-या गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेले व किचकट खटल्यात मागणी होत असलेले विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारची बाजू मांडली होती. ब-याच कालखंडानंतर ते खटला हरले आहेत.
भुसावळ येथील बीएमसी क्वॉर्टर भागातील रहिवासी अशोक बाविस्कर याने बहिणीच्या चिथावणीवरून 26 जानेवारी 1996 रोजी पत्नी आशाबाईच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते. त्यात ती 100 टक्के जळाल्याने तिला नगरपालिकेच्या रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. आशाबाईने भुसावळ येथे दोन मृत्यूपूर्व जबाब दिले होत, तर जिल्हा रुग्णालयातही दोन जबाब दिले होते. या प्रकरणी खुनाचा खटला दाखल झाल्यानंतर आरोपी व मयत यांची सहा वर्षांची मुलगी नीलिमा हिनेदेखील साक्ष देताना वडिलांनीच आईला पेटवून दिल्याचे सांगितले होते. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते. या खटल्यासाठी फिर्यादी पक्षातर्फे स्वतंत्र वकील लावण्याची मागणी केली होती. त्यात राज्याच्या विधी व न्याय विभागाने जळगाव जिल्ह्याचे सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांच्यासारखा तज्ज्ञ वकील असल्याने खासगी वकिलाची नियुक्ती न करता अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती केली होती. अ‍ॅड. निकम यांनी युक्तिवादात आरोपीनेच पत्नीचा खून केल्याचा युक्तिवाद केला तर आरोपीतर्फे अ‍ॅड. अकील इस्माईल यांनी मयताच्या जबाबातील तफावत असल्याचे सांगितले होते.
तब्बल 16 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा निकाल शनिवारी न्यायाधीश पी. डी. अंबेकर यांच्या न्यायालयाने दिला. त्यात आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड. निकम बाजू मांडत असल्याने अनेकांचे लक्ष लागून होते. मुंबईवरील हल्ला असो की बॉम्बस्फोटाचे खटले, खैरलांजी प्रकरणातही आरोपींना जेलची हवा दाखवणारे अ‍ॅड. निकम हे ब-याच कालखंडानंतर खटला
हरले असल्याची माहिती न्यायालयातील सूत्रांनी दिली.