आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्हा संवेदनशील; गुप्तचर विभागाचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिसअधीक्षक कार्यालयात शुक्रवारी गुन्हेगारीसंदर्भात झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान अनैतिक मानवी वाहतूक कक्ष जादूटोणा विरोधी कक्षाची स्थापना करण्यात आली. दरम्यान, बालकांच्या हरवण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता, शासनाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्या अनुषंगाने या दोन्ही कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

आता १६ वर्षांखालील अल्पवयीन मुले हरवल्यास पोलिस ठाण्यात पूर्वीप्रमाणे हरवल्याबाबत नोंद करण्यात येणार नसून थेट अपहरणाचा गुन्हा दाखल होणार आहे. चार महिन्यांच्या कालावधीत संबंधित बालकाचा शोध लागल्यास अनैतिक मानवी वाहतूक पथक त्याचा तपास करणार आहे. हे दोन्ही कक्ष स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत राहणार आहेत. एएचटीयूचे मुख्य कार्यालयात अहमदनगर येथे आहे. मानवी अनैतिक वाहतूक प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन प्रशिक्षण या कार्यालयामार्फत पोलिसांना देण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते या दोन्ही कक्षांचे प्रभारी अधिकारी राहणार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक दीपक लगड इतर दोन कर्मचाऱ्यांची या कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जादूटोणा विरोधी प्रतिबंधक कक्ष प्रत्येक पोलिस ठाण्यातही स्थापन करण्यात येणार असून संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षक त्याचे प्रभारी राहणार आहेत. तर यासाठी इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात गुन्हेगारांवर मकाेका, हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश

दंगलीतसहभागी असणारे इतर सराईत गुन्हेगारांवर गणेशोत्सवाच्या काळात शांतता सुव्यवस्था कायम राखण्यासाठी एमपीडीए, मकाेका १४४ अन्वये कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी पोलिस अधिकाऱ्यांसाेबत घेतलेल्या क्राइम मिटिंगमध्ये दिले आहेत. पाच तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली.

बैठकीला जिल्हाभरातील पोलिस अधिकाऱ्यांसह गुप्तचर िवभागाचे अनंत मिश्रा गुप्तवार्ता विभागाचे आर.आर.भागवत उपस्थित होते. शहरात वाढलेल्या सोनसाळखी चोऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या वेळी चोरांच्या बंदोबस्ताचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले.

मागीलदंगलींचा अभ्यास करा
जळगावजिल्हा संवेदनशील असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मत गुप्तचर िवभागाचे अधिकारी मिश्रा एसआयडीचे भागवत यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात अगदी छोट्याशा कारणांवरून दंगली झाल्याचा इतिहास आहे. या दंगलीची कारणे, त्यामागे असलेल्या शक्ती, याबाबत पोलिसांनी अभ्यास करावा. जातीय तणाव दंगलीची परिस्थिती उद््भवल्यास परिस्थिती कशी हाताळावी? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या पोलिसांना सूचना केल्या. जातीय तणाव दंगलीच्या काळात गुप्तचर िवभाग एसआयडी या दोन्ही कार्यालयांशी समन्वय राहावा. तसेच अधिकाऱ्यांच्या ओळखी व्हाव्या, या अनुषंगाने मिश्रा भागवत यांना बैठकीला बोलवण्यात आले होते.

गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या दोन्ही गटांची पोलिस निरीक्षकांनी बाजू ऐकावी. कोणत्याही एका बाजूला झुकते माप जाणार नाही, याची काळजी घ्यावी. पर्यायाने जनतेत वेगळा संदेश जाणार नाही, असे आदेश या वेळी बोलताना पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिले.

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत पत्र
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत. व्यापारी त्यांच्या प्रतिष्ठानांच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावतात. त्यामुळे दुकानात चोरी झाल्यास चोरटे त्यात कैद होतात. मात्र, ते नेमके कोठून आले, याबाबत स्पष्ट होत नाही. त्यामुळे सराफ बाजार, मॉल महत्त्वाची व्यापारी प्रतिष्ठाने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे. याबाबत व्यापाऱ्यांना पत्रही देण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले.

हस्तक्षेप करणाऱ्यांवरही गुन्हा
हिंदू-मुस्लिमसमाजात तेढ निर्माण झाल्याबाबतची तक्रार आल्यास कोणत्याही प्रकारची तडजोड करता थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उत्सवांच्या कालावधीत पोलिसांनी कारवाई करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. त्याचप्रमाणे कारवाईदरम्यान हस्तक्षेप करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.
पोलिसमित्र मदतीला
युवासुरक्षा अभियानांतर्गत गणेशोत्सव काळात पोलिस मित्रांची बंदोबस्तासाठी मदत घेतली जाणार आहे. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ हे त्यांना अापत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणार आहेत.

भोंदूगिरीलाही बसणार चाप
जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातून भोंदुगिरीविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. विविध आमिष दाखवून नागरिकांच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या भोंदूबांबांवर या कक्षातील अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे जादूटोणा, भानामती, करणी आदी अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्यासंदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.

बालकांचेअपहरण करून त्यांची विक्री करणे, त्यांना भीक मागायला लावणे, कारखान्यात कामाला लावणे आदी प्रकार वाढले आहेत. त्यामुळे एकदा हरवलेल्या बालकाचा पुन्हा शोध लागण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. हे प्रमाण माेठ्या महानगरांमध्ये अधिक प्रमाणात आहे.

दरमहिन्याला १० अल्पवयीन मुले हरवल्याच्या तक्रारी
दरमहिन्याला अल्पवयीन मुले हरवल्याबाबत सरासरी १० ते १५ तक्रारी दाखल होत असतात. त्यापैकी १० अल्पवयीन मुलांचा तपास लागतो. मात्र, पाच मुलांचा तपास लागत नसल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे महेश पाटील यांनी सांगितले.